कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षी 9 ऑगस्टच्या रात्री रात्रपाळीत कर्तव्य बजावत असणार्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी दुसर्याच दिवशी आरोपी संजय रॉय याला अटक केली होती. डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आरोपीवरील कारवाईसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी संजय रॉय हा शुक्रवारपासून मौन बाळगून होता. न्यायालयाने दोषी ठरविण्याच्या दिवशी त्याने तुरुंगात मटण खाल्ले होते. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर तो तुरुंगात चुप्पी साधून होता. एरवी, मात्र नराधम तुरुंगातील कर्मचार्यांसोबत मूर्खासारखे हास्यविनोद करीत होता.
पोलिस दलासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणारा रॉय या सायंकाळी चार वाजता सेमिनॉर हॉलमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले होते. रॉय याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली होती. तो विकृत, लिंगपिसाट आणि मनोरुग्ण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या चाचणीतूही स्पष्ट झाले होते.
गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी संयज रॉय याने आर. जी. कर वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात रात्रपाळीत काम करणार्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.
तिची हत्या केल्यानंतर रॉय याने पीडितेन आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. यासाठी त्याने घटनास्थळावरून रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला होता.
पीडितेच्या आई-वडिलांना दूरध्वनी करून आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले होते. पीडितेच्या मृतदेहावरील जखमांवरून बलात्कार आणि खुनाचा उलघडा झाला होता.
पश्चिम बंगाल पोलिसांकडून तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. आमच्या पोलिसांकडे तपास असता तर न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा ठोठावली असती, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. डॉक्टरवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेनंतर बॅनर्जी यांचे सरकार टीकेचे केंद्रस्थान बनले होते.
संजय रॉय याच्या आईचे नाव मालती आहे. त्यांनी रॉय याला फाशी अथवा जन्मठेप झाल्यास आपणास काहीही दुख होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निर्णयास आम्ही आव्हान देणार नसल्याचे रॉय याची बहीण सविता यांनी सांगितले.