Kolhapuri chappal | कोल्हापुरी चप्पल आता न्यूझीलंडमध्येही मिळणार Pudhari File photo
राष्ट्रीय

Kolhapuri chappal | कोल्हापुरी चप्पल आता न्यूझीलंडमध्येही मिळणार

भारत-न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार कराराचे फलित

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत व न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार करार अंतिम झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर या कराराची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंडनेही एक्सद्वारे ही माहिती शेअर केली. विशेष म्हणजे या करारांतर्गत जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल इटलीपाठोपाठ आता थेट न्यूझीलंडमध्ये उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, पुढील पंधरा वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्रालाही या कराराचा मोठा फायदा होईल. ते म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ते जीआय टॅग्ड उत्पादने, शेतकरी, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि सेवा क्षेत्रांपर्यंत सर्वांना याचा लाभ होणार आहे. न्यूझीलंडमध्ये या उत्पादनांची निर्यात करणे सोपे होईल. या करारामुळे तरुणांसाठी शिक्षण आणि रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील. पदवीधरांसाठी 2 वर्षे, पदव्युत्तरांसाठी 3 वर्षे आणि पीएचडीधारकांसाठी चार वर्षांचा व्हिसा देण्यात आला आहे.

2025 मध्ये हा भारताचा तिसरा मुक्त व्यापार करार आहे. यापूर्वी ब्रिटन आणि ओमानसोबत असे करार झाले आहेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा आणि पुढील 15 वर्षांत न्यूझीलंड भारतात 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विश्वास व्यक्त केला. न्यूझीलंडला केल्या जाणार्‍या निर्यातीत इंधन, कापड आणि औषधांचा समावेश आहे. विमान इंधन निर्यात 11.08 कोटी डॉलरची असून त्यात कपडे, कापड आणि घरगुती वापराच्या कापडाच्या वस्तूंचा समावेश आहे. औषधे 5.75, यंत्रसामग्री आणि टर्बोजेटस्ची निर्यात 5.18 कोटी डॉलरवर गेली. याशिवाय डिझेलची निर्यात 4.78 आणि पेट्रोलची 2.27 कोटी डॉलर आहे. सोन्याचे दागिने 99 लाख डॉलर, बासमती तांदूळ 1.19, कोळंबी 1.37, स्टील 1.41, इलेक्ट्रॉनिक्स 1.65, पेपरबोर्ड 1.83, वाहने आणि वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात 1.93 कोटी डॉलर आहे.

सेवा क्षेत्राचे सहकार्य

भारताच्या सेवा क्षेत्राने आर्थिक वर्ष 2024 मध्ये न्यूझीलंडला 21.41 कोटी डॉलरची निर्यात केली आहे. न्यूझीलंडने 45.65 कोटींची निर्यात केली आहे. भारताच्या आयटी क्षेत्राने संगणकीय प्रणाली आणि टेलिकम्युनिकेशनसाठी न्यूझीलंडला मदत केली आहे. त्याचा फायदा आरोग्य आणि वित्तीय सेवा सुधारण्यात झाला आहे.

प्रति नग 85 हजार रुपये दर

इटलीतील प्रसिद्ध फॅशन कंपनी ‘प्राडा’ने यापूर्वीच कोल्हापुरातील कारागिरांच्या सहकार्याने कोल्हापुरी चपलांच्या दोन हजार जोड्यांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. या कंपनीचे शिष्टमंडळ कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ‘जगात भारी, आम्ही कोल्हापुरी’, अशी प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी व्यक्त केली होती. प्रति नग 800 युरोला (सुमारे 85 हजार रुपये) कोल्हापुरी चपलांची विक्री जगभरात फेब्रुवारी 2026 पासून केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT