नवी दिल्ली : तीन महिन्यांच्या अल्पावधीतच कोल्हापूर बेंच पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत असल्याचा आनंद आहे. त्याचबरोबर निवृत्तीनंतर आदिवासींसाठी काम करायला आवडेल. माझ्या वडिलांच्या निवडणुकीतील प्रचारावेळी त्यांचे जीवन जवळून पाहिले आहे, अशी भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.
सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. मात्र, दि. 22 आणि 23 रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार येत असल्याने शुक्रवारी (दि. 21 ) त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने त्यांना समारंभपूर्वक निरोप दिला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निरोप समारंभाला त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी गवई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या मंचावर पुढील सरन्यायाधीश सूर्यकांत, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विकास सिंह उपस्थित होते. तर सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, ॲटर्नी जनरल (आर. वेंकटरमाणी), विविध उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वकील कार्यक्रमाला उपस्थित होते.