कापसात गुंडाळून वाहतूक, लाकडी चाकूने कापतात! १५०० रुपयांना एक, भारतातील सर्वात महागडा आंबा चर्चेत  file photo
राष्ट्रीय

कापसात गुंडाळून वाहतूक, लाकडी चाकूने कापतात! १५०० रुपयांना एक, भारतातील सर्वात महागडा आंबा चर्चेत

एका आंब्याची किंमत १५०० रुपये! हर्ष गोएंका यांच्या पोस्टमुळे ‘या’ खास आंब्याची देशभर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

kohitur mango is grown in west bengal selling for approximately 1500 per piece

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिग्गज उद्योगपती आणि RPG Enterprises चे चेअरमन हर्ष गोयनका यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आंब्याच्या एका खास आणि दुर्मिळ जातीबाबत पोस्ट शेअर केली आहे. हा आंबा इतका नाजूक असतो की त्याच्या वाहतुकीसाठी कापसाचा वापर केला जातो. तसेच हा आंबा लोखंडी चाकूऐवजी लाकडी चाकूने कापला जातो.

भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश असून जागतिक उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. भारतासोबतच चीन, पाकिस्तान, थायलंड, मेक्सिको, ब्राझील आणि इंडोनेशिया या देशांमध्येही आंब्याची लागवड केली जाते.

भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आंब्याच्या अनेक जाती आढळतात. मात्र यापैकी काही जाती इतक्या महाग आहेत की, त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे पिकणाऱ्या ‘कोहितूर’ आंब्याचा समावेश होतो. कोहितूर आंबा हा भारतातील सर्वात महागडा आंबा मानला जातो.

हर्ष गोयनका यांनी ‘एक्स’वर कोहितूर आंब्याचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “कोहितूर हा पश्चिम बंगाल (मुर्शिदाबाद) येथील एक दुर्मिळ आणि प्रीमियम आंबा आहे. पूर्वीच्या काळात हा आंबा केवळ नवाबांसाठी राखीव होता. एका कोहितूर आंब्याची किंमत 1,500 रुपयांपेक्षा जास्त आहे. याचा साल इतका नाजूक असते की हाताळताना तो कापसात गुंडाळला जातो.”

कोहितूर आंब्याची वैशिष्ट्ये

कोहितूर आंबा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि पोतासाठी ओळखला जातो. असा विश्वास आहे की 18व्या शतकात बागायती तज्ज्ञ हकीम अदा मोहम्मदी यांनी नवाब सिराज-उद-दौलासाठी हा आंबा खास पद्धतीने विकसित केला होता. विलुप्त झालेल्या ‘कलोपहार’ आंब्याच्या जातीपासून आणि आणखी एका जातीच्या संकरातून कोहितूरची निर्मिती करण्यात आली होती.

हा अत्यंत मौल्यवान आंबा इतका नाजूक असतो की, त्याचे प्रत्येक फळ अत्यंत काळजीपूर्वक तोडावे लागते. मुर्शिदाबादच्या बाहेर हा आंबा नेणेही सोपे नाही. वाहतुकीदरम्यान नुकसान होऊ नये म्हणून तो कापसात ठेवला जातो. विशेष म्हणजे मुर्शिदाबादहून कोलकात्यापर्यंतच्या प्रवासातच त्याच्या चवीत बदल होतो. त्यामुळे या आंब्याची निर्यात करणे शक्य नाही. हा आंबा किती नाजूक आहे, याचा अंदाज यावरून येतो की तो लोखंडी चाकूने नव्हे तर लाकडी चाकूने कापला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT