राष्ट्रीय

Kissan GPT : शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; ‘किसानGPT’ देईल उत्तर; तरुणाने बनवले शेतकऱ्यांच्या फायद्याचे ॲप

शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; ‘किसानGPT’ देईल उत्तर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : गेले काही दिवस आपण आर्टिफिशिअल इंटिलिजन्सद्वारे ( AI- Artificial Intelligence – कृत्रिम बुद्धिमत्ता) विकसित केलेल्या ChtGpt ची सर्वत्र चर्चा ऐकत आहोत. यामुळे अनेक क्षेत्र प्रभावित होणार आहेत यासंबंधी चर्चा सुरु आहे. या ChtGpt व्दारे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जवळजवळ अचूक उत्तरे मिळतात. चॅट जीपीटी आल्यानंतर एआय आधारित टूलच्या माध्यमातून भविष्यात अनेक महत्त्वाची कामे करता येणार असल्याचे बोलले जात आहे. याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी गुजरातच्या सुरत येथील तरुण प्रतिक देसाई यांनी 'किसान जीपीटी' ची निर्मिती केली आहे. 'किसान जीपीटी' ची सर्वत्र चर्चा होत आहे. पुढारी ऑनलाईन टीमने प्रतिक देसाई यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'किसान जीपीटी' तयार करण्याची प्रेरणा ही, शेतीची कौटुंबिक पार्श्वभूमीतून मिळाली. तसेच भारतीय शेतीला AI चे फायदे मिळावेत या हेतूने किसान जीपीटी बनवले. वाचा प्रतिक देसाई यांनी सुरु केलेल्या 'किसान जीपीटी' बद्दल.

Kissan GPT : काय आहे 'किसान जीपीटी'

सूरतचे प्रतिक देसाई यांनी अभियांत्रिकीमध्ये पीएचडी केली. गेली 10 वर्षे मशीन लर्निंग आणि AI मध्ये काम करत आहे. टिटोडीपूर्वी 3 स्टार्टअप्सची स्थापना केली. तळागाळातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून टिटोडीने चार वर्षांपूर्वी भारतीय कृषी क्षेत्रात AI आणि ML ऍप्लिकेशन्स आणण्यासाठी सुरुवात केली. संगणक तज्ज्ञ, लेखक, संशोधक (Phd) असलेल्या प्रतिक देसाई यांची कृषी कौटूंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर शेतकऱ्यांसाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI- Artificial Intelligence) आधारित 'किसान जीपीटी'ची निर्मिती केली आहे. हे ॲप त्यांनी १५ मार्च रोजी लॉंच केले. याच्या माध्यमातून तुम्ही कृषी संबंधित हवी ती माहिती मिळवू शकता. उदा. आजचं हवामान काय आहे? शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात कोणत्या योजना आहेत? पश्चिम महाराष्ट्रातील जमीन प्रकाराबद्दल माहिती, भारतातील जमिनीचे प्रकार, आदी विषयांवर तुम्हाला 'किसान जीपीटी' च्या माध्यमातून माहिती मिळू शकते. प्रश्नकर्त्याला त्यांच्या प्रश्नांची जवळजवळ अचूक उत्तरे मिळतात.

'किसान जीपीटी' च्या माध्यमातून तुम्ही १० भारतीय भाषांमध्ये आणि चार विदेशी भाषांमध्ये तुमचे प्रश्न, तुम्हाला हवी असणारी माहिती विचारु शकता. या १० भारतीय भाषांमध्ये हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, तमिळ, तेलगू, मराठी, पंजाबी, मल्याळम आणि इंग्रजी त्याचबरोबर स्पॅनिश, पोर्तुगिज, जपानी आणि इंडोनेशियाई या विदेशी भाषा आहेत.

विचारण्यासाठी काही उदाहरणे

'किसान जीपीटी' ओपन केल्यानंतर विचारण्यासाठी काही उदाहरणे दिली आहे. त्यामध्ये मातीची स्थीती कशी सुधारायची?, कोबीवरील कीटक नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी पद्धती कोणत्या आहेत?, उत्तर भारतात भेंडीची लागवड करण्यासाठी योग्य वेळ कोणती?, आंब्याच्या झाडावरील कीटक नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी पद्धती कोणत्या आहेत? या प्र्श्नांवरुन प्रश्नकर्त्याला सर्वसाधारण अंदाज येऊ शकतो की, प्रश्न कोणत्या स्वरुपाचे विचारु शकतो.

'किसान जीपीटी'ला कशी माहिती विचाराल

  • प्रथम तुम्ही https://kissangpt.com/ वेबसाइटवर जा

  • यानंतर तुम्ही तुमची भाषा निवडा (१४ भारतीय भाषा आणि ४ विदेशी)

  • भाषा निवडल्यानंतर चॅटबॉटवर जाऊन तुम्हाला हवी असणारी माहिती विचारा

  • काही सेंकदात तुम्हाला 'किसान जीपीटी' तुम्हाला हवी असणारी माहिती सांगेल

पुढारी ऑनलाईन टीमने 'किसान जीपीटी'चे निर्माते प्रतिक देसाई यांच्याशी संवाद साधला आणि किसानGPT शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर आहे, पुढील विविध प्रश्नांवर माहिती दिली.

शेती हाच विषय का निवडला?

'किसान जीपीटी' सुरु करण्याची प्रेरणा कु़ठून मिळाली आणि शेती हाच विषय का निवडला. यावर बोलताना प्रतिक सांगतात, "शेतीची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि भारतीय शेतीला AI चे होणारे फायदे" ही होती. सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम केल्यानंतर त्याचबरोबर काही स्टार्टअप सुरू केल्यानंतर, मला माझे कौशल्य माझे कुटुंब पिढ्यानपिढ्या गुंतलेल्या कृषी क्षेत्रात वापरायचे होते. भारतीय कृषी क्षेत्रातील AI व्हॉईस असिस्टंटची गरज ओळखून, 'किसान जीपीटी' निर्मिती झाली. हे करत असताना आम्ही ग्रामीण लोकांमध्ये स्मार्टफोनचा असलेला वापर, बहुभाषिकता, वास्तविक वेळेचे मूल्य, वैयक्तिक कृषी सल्ल्यावर लक्ष केंद्रित केले.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

आम्ही एक लहान स्टार्टअप आहोत. शेतकऱ्यांपर्यंत हे ॲप पोहोचवण्यासाठी आम्ही अद्याप कोणतेही मार्केटिंग उपक्रम सुरु केलेले नाही. जेव्हा आम्ही आमचे ॲप सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा अनेकांना ते उपयुक्त वाटले. त्यानंतर त्यांनीच स्वत:हून शेअर करण्यास सुरुवात केली. जेव्हा शेतकरी वर्गात 'किसान जीपीटी' बद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याची उपयुक्तता पाहून त्यांच्या वर्तुळात शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे ॲप वापरकर्त्यांच्या संख्येत प्रभावीपणे वाढ झाली. दिवसेंदिवस भारताच्या कानाकोपऱ्यातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत आहे. लवकरचं आम्ही सरकार, शेतकरी समुदाय, कृषी संस्था (FPO_Farmers Producer Organisation) आणि इतर संस्थांसह विविध सरकारी संस्थांसोबत जोडणार आहोत. ज्यामुळे आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोपे जाईल.

दररोज चार ते पाच हजार प्रश्न विचारले जातात

'किसान जीपीटी' लाँच झाल्याच्या पहिल्या ४० दिवसांत, 'किसान जीपीटी' ला ६०,००० हून अधिक अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. अलिकडच्या अपडेटनुसार दररोज चार ते पाच हजार प्रश्न विचारले जातात. दिवसेंदिवस प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असं प्रतिक सांगतात.

लवकरच नवनवीन विविध वैशिष्ट्यांसह विकसित करु

प्रतिक देसाई पुढे सांगतात, लवकरच आम्ही 'किसान जीपीटी'मध्ये नवनवीन विविध वैशिष्ट्यांसह विकसित करत आहोत. उदा. शेतकऱ्यांचे 'किसान जीपीटी' वर खाते (Account) तयार करणे आणि युजर्सने मागील प्रश्न सुरक्षितपणे संग्रहित करणे, अधिक अचुक उत्तरे या अनुषंगाने विकसित केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT