kiren rijiju pawan khera swimming video row
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या अरुणाचल प्रदेशातील पोहण्याच्या (स्विमिंग) व्हिडिओवरून टीका करणाऱ्या काँग्रेस नेते पवन खेडा यांना खडे बोल सुनावले आहेत. रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत खेडा यांच्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच त्यांना 'अशोभनीय टिप्पणी' न करण्याचा सल्ला दिला.
आपल्या पोस्टमध्ये रिजिजू यांनी म्हटलं आहे की. "तुम्ही तुमच्या पक्षाने राज्यसभेवर पाठवलेले पहिल्यांदाच खासदार झालेले नेते आहात, तर मी आतापर्यंत तब्बल आठ निवडणुका लढवलो आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्यावर अशोभनीय टिप्पणी करण्याचा कोणताही अधिकार उरत नाही. मी माझ्या गावातील लोकांशी आणि समर्थकांशी संपर्क साधण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांच्यासोबत नदीत पोहतो," असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्याशी होणाऱ्या तुलनेवर बोलताना रिजिजू म्हणाले, "जेव्हा मी माझ्या लोकांमध्ये असतो, तेव्हा माझ्या मनात राहुल गांधींचा विचारही नसतो. परंतु, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच 'मी राहुल गांधींसारखे पोहू शकत नाही' अशा कमेंट्स करायला सुरुवात केली. मी कोणत्याही खेळाचे किंवा उपक्रमाचे वेगळे प्रशिक्षण घेतलेले नाही. मी आपल्या अथांग नद्यांमध्ये लहानाचा मोठा झालेला नैसर्गिक खेळाडू (नॅचरल खेळाडू) आहे. त्यामुळे दरवेळी उगाचच अपमानकारक भाषा वापरणे थांबवा," असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी रिजिजू यांनी पवन खेडा यांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांच्या नावाचा वापर करत मिश्किल टोलाही लगावला. "पवन खेडा जी, जर तुम्ही माझ्या अर्धनग्न पोहण्याबद्दल असेच बोलत राहिलात, तर तुमच्या या गैरवर्तनाची तक्रार मी मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांच्याकडे करेन. मला सांगा, तुम्ही पोहायला जाताना पूर्ण सूट आणि कोट घालून पोहता का?" असा खोचक सवाल रिजिजू यांनी विचारला आहे.
पवन खेडा यांनी रिजिजू यांच्या व्हिडिओवर टीका करताना म्हटले होते की, "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजपच्या मनात किती धडकी भरवत आहेत हे यावरून दिसते. एकीकडे किरण रिजिजू राहुल गांधींचे नाव घेतल्याशिवाय अर्धनग्न पोहायलाही जाऊ शकत नाहीत, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांना स्वतःला '७४ वर्षांचे नवजात बाळ' म्हणावे लागत आहे. राहुल जी, तुम्ही या सर्वांचे काय करून ठेवले आहे?"
किरण रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील नद्यांमध्ये पोहतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. "ज्यांना पोहता येत नाही त्यांनी खोल पाण्यात जाऊ नये, अरुणाचलच्या नद्या खूप मोठ्या आणि खोल असतात," असा सल्ला त्यांनी दिला होता. यानंतर दुसऱ्या व्हिडिओत त्यांनी स्विमिंग पूल आणि पहाडी नद्यांमधील पोहण्यातील फरक स्पष्ट केला. "काहींना वाटत असेल की अरुणाचलच्या वेगवान नद्यांमध्ये पोहणे म्हणजे स्विमिंग पूल किंवा यमुनेसारख्या संथ नदीत पोहण्यासारखे आहे. पण तसे नसते. वेगवान प्रवाहात पोहताना डोके वर आणि शरीर सरळ ठेवावे लागते. मी इथलाच खेळाडू आहे," असे रिजिजू यांनी म्हटले होते.