परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर खालिदा झिया यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असून, बांगलादेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत भारताचे स्थान पुन्हा भक्कम करण्यासाठी आणि नव्या नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
India Bangladesh Relations
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बुधवारी (३१ डिसेंबर) रोजी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या (BNP) अध्यक्षा खालिदा झिया यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा हा दौरा ढाकासोबत पुन्हा सलोखा प्रस्थापित करण्याचा केंद्र सरकारचा मोठा प्रयत्न मानला जात आहे.
खालिदा झिया यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि 'बीएनपी'चे सर्वेसर्वा तारिक रहमान १७ वर्षांनंतर मायदेशी परतले आहेत. बांगलादेशात लवकरच निवडणुका होणार असून रहमान यांचा पक्ष निवडणुकीत सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, खालिदा झिया यांच्या १९९१-९६ आणि २००१-०६ या कार्यकाळातील धोरणे अनेकदा चीनबरोबर मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारी होती. विशेषतः त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बांगलादेशने चीनसोबत लष्करी करार करून भारताची चिंता वाढवली होती. सध्याच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने भारतापासून काहीसे अंतर राखले असून, बांगलादेश पुन्हा पाकिस्तान आणि चीनच्या प्रभावाखाली जाण्याची भीती भारताला वाटत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारिक रहमान यांनी सावध आणि संतुलित पवित्रा घेतल्याचे दिसते. ढाका येथील एका सभेत त्यांनी स्पष्ट केले की, "आमच्यासाठी दिल्ली किंवा पिंडी (रावळपिंडी) महत्त्वाचे नसून, 'बांगलादेश प्रथम' हेच आमचे धोरण असेल." यावेळी रहमान यांनी भारतविरोधी समजल्या जाणाऱ्या 'जमात-ए-इस्लामी' या कट्टरपंथी संघटनेवरही टीका केली आहे. एकेकाळी ही संघटना 'बीएनपी'ची मित्रपक्ष होती, मात्र आता त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.
तारिक रहमान यांनी दिलेली 'बांगलादेश फर्स्ट'ची घोषणा हा त्यांच्या कौटुंबिक राजकीय वारशाचाच एक भाग मानला जात आहे. आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या (BNP) अध्यक्षा खालिदा झिया यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असून, बांगलादेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत भारताचे स्थान पुन्हा भक्कम करण्यासाठी आणि नव्या नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.