Kerala Nipah Alert : केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील संशयित निपाह बाधित रुग्णाचा आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम तीव्र केली आहे. तसेच सहा जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, निपाह विषाणू हा एक झुनोटिक आजार आहे, जो प्राण्यांकडून माणसात पसरतो. तसेच, दूषित अन्न किंवा थेट मानवी संपर्कातूनही त्याचा प्रसार होऊ शकतो.
पलक्कड जिल्ह्यातील निपाह विषाणूच्या संसर्गाचा झाल्याचा संशय असलेल्या 57 वर्षीय पुरुषांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे नमुने मंचेरी वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले. त्याला निपाहची लागण झाल्याचे निदान झाले होते, अशी माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी एका निवेदनात दिली. मात्र पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (NIV) अहवालाला अंतिम दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केरळमध्ये काही दिवसांतील निपाहशी संबंधित हा दुसरा मृत्यू आहे. काही दिवसांपूर्वी मलप्पुरम येथील एका व्यक्तीचा या संसर्गाने मृत्यू झाला होता, तर पलक्कड जिल्ह्यातील आणखी एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या नवीन संशयित प्रकरणानंतर, सरकारने या भागात संपर्क शोधमोहीम आणि क्षेत्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान केले आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. संपर्क यादीतील लोकांना ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशन डेटाचा वापर करण्यात आला आहे. रुग्णाच्या अलीकडील प्रवासाची माहिती आणि संपर्कांचा शोध घेण्यासाठी कौटुंबिक माहिती तयार करण्यात आली आहे.
पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील लोकांना, विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, रुग्णालयांना अनावश्यक भेटी देणे टाळण्याचे आवाहन केले आहे. उपचार घेत असलेल्या मित्र किंवा नातेवाईकांना भेटण्यावर कठोर निर्बंध घालण्यात यावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या सर्वांनी नेहमी मास्क घालणे अनिवार्य आहे, असे एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी सहा जिल्ह्यांतील रुग्णालयांसाठी निपाहचा इशारा जारी केला आहे. पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर, वायनाड आणि थ्रिसूर येथील वैद्यकीय सुविधांना या सूचना पाठवण्यात आल्या आहेत. ताप आणि एन्सेफलायटीस (मेंदूज्वर) किंवा तीव्र तापासारखी निपाहची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची माहिती तात्काळ देण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत, असे आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.