कोची : कोची शहर सायबर पोलिसांनी कंबोडिया आधारित आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणातील सर्व आरोपी केरळचे रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. हैदराबादमधील एका तरुण डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. हा डॉक्टर कोचीतील नामांकित खासगी रुग्णालयात कार्यरत असून विवाह संकेतस्थळावरील ओळखीतून त्याची तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
आरोपींनी विवाह संकेतस्थळावर एनआरआय महिला असल्याचे भासवून डॉक्टरशी संपर्क साधला. बनावट प्रोफाईल तयार करून सतत संवाद साधत विश्वास मिळवण्यात आला. नंतर ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून डॉक्टरकडून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून घेण्यात आली. सुरुवातीला थोडा परतावा देऊन विश्वास अधिक दृढ केला, मात्र मोठी रक्कम जमा होताच संपर्क तुटला आणि प्रोफाईलही हटवण्यात आले.
सहायक पोलिस आयुक्त जुल्फिकर एस. आणि निरीक्षक शमीर खान यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. तपासात कंबोडियामधून कार्यरत असलेला सूरज कृष्णा (22, आरोर, अलापुझा) हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. तो चिनी नागरिकांच्या निर्देशानुसार काम करत होता. भारतात परतताच त्याच्यावर पाळत ठेवून अरोर येथून अटक करण्यात आली.