नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केरळमधील ग्राहक मंचाने एका डॉक्टरला आणि खासगी रुग्णालयाला एका मुलाच्या आईला ५० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. या मुलाचे वय अवघे २३ दिवस असताना केलेल्या सुंता प्रक्रियेदरम्यान त्याचे गुप्तांग कायमचे विद्रूप झाले होते.
मुलाचे कोवळे वय, त्याला झालेल्या वेदना व यातना, भविष्यातील वैद्यकीय देखभाल आणि अनेक शस्त्रक्रियांसह करावी लागणारी प्लास्टिक सर्जरी, सुखसुविधांचे झालेले नुकसान, मानसिक परिणाम आणि भविष्यातील मूत्रविसर्जन, लैंगिक व पुनरुत्पादन क्षमतेबाबतची अनिश्चितता लक्षात घेता ही भरपाई आवश्यक होती, असे निरीक्षण मंचाचे अध्यक्ष मोहनदासन के., सदस्य प्रीती शिवरामन सी. व मोहम्मद इस्माईल सी. व्ही. यांनी नोंदवले. अवघ्या २३ दिवसांच्या या नवजात बालकावर सुंता करण्याची प्रक्रिया केली गेली. त्यानंतर लगेच त्याला गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागला.
ग्राहक मंचाने डॉक्टर, रुग्णालयाचे मालक व रुग्णालय यांना संयुक्त व वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून, वेदना, यातना, आयुष्यातील सुखसुविधांचे आयुष्यभराचे नुकसान, मानसिक परिणाम आणि भविष्यातील मूत्रविसर्जन, लैंगिक व पुनरुत्पादन कार्यांबाबतच्या अनिश्चिततेसाठी २५ लाख रुपये भरपाई म्हणून मंजूर केले. तसेच, अनेक प्लास्टिक शस्त्रक्रियांसह भविष्यातील वैद्यकीय उपचारांसाठी २५ लाख रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून २५,००० रुपये मंजूर केले.
चुकलेली सुंता
सुंतानंतर बालकाला लघवीचा त्रास होऊ लागला. तो सतत रडत होता. मलमपट्टीतून लघवी गळत होती. रुग्णालयात चकरा मारूनही त्याची प्रकृती खालावली आणि त्याला संसर्ग झाला. शेवटी थ्रिसूरमधील उच्च वैद्यकीय केंद्रात शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या लघवीचा मार्ग बदलण्यात आला. या सार्यात मुलाच्या लिंगाचे गंभीर नुकसान झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे सुंता करण्याचा अनुभव नव्हता. रुग्णालयात पुरेशा सुविधा व योग्य निर्जंतुकीकरण नियम पाळले जात नव्हते, असे आरोप मुलाच्या आईने केले होते.