पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये निपाह विषाणूची (Nipah virus) लागण झालेल्या १४ वर्षाच्या मुलाचा उपचार सुरु असताना आज ( दि. २१) मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील आणि काका यांनाही या विषाणूची लागण झाली असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी माध्यमांना दिली.
आरोग्य मंत्री जॉर्ज यांनी सांगितले की, मलप्पुरममध्ये निपाह विषाणूची (Nipah virus) लागण झालेला रुग्ण आढळला होता. निपाहच्या नियंत्रणासाठी, सरकारी आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) च्या आधारे 25 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू झाले आहे.
निपाह विषाणू (NiV) हा एक आजार आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. त्याला झुनोटिक रोग म्हणतात. वटवाघुळ आणि डुकरांपासून ते मानवांमध्ये पसरू शकते. या विषाणूमुळे ताप, उलट्या, श्वसनाचे आजार आणि मेंदूला सूज येऊ शकते.
विषाणूजन्य तापाची सामान्य लक्षणे निर्माण करण्याव्यतिरिक्त, हा संसर्ग मज्जासंस्थेवर देखील परिणाम करतो. मध्यवर्ती मज्जासंस्था देखील यामुळे प्रभावित होते, ज्यामुळे मेंदूला सूज किंवा एन्सेफलायटीस होतो. यामुळे २४ ते ४८ तासांत रुग्ण कोमात जाऊ शकतो.
निपाहचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसच मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसारनिपाह संसर्ग झालेल्या रुग्णाला ४० ते ७५ टक्के मृत्यूचा धोका असतो.
जागतिक आरोग्यसंघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे, म्हणजे तो प्राणी आणि लोकांमध्ये पसरू शकतो. हा हवेतून पसरणारा संसर्ग नाही. मात्र दूषित अन्नाद्वारे किंवा थेट व्यक्ती-व्यक्तीद्वारे संक्रमित होऊ शकतो. निपाह विषाणू डुकरांना आणि माणसांमध्ये आजार निर्माण करण्यासाठी देखील ओळखला जातो. या विषाणूचे नाव निपाह हे मलेशियातील गावातून घेतले गेले आहे. येथे या विषाणूमुळे पहिला रुग्ण बळी गेला होता.