एर्नाकुलम; वृत्तसंस्था : केरळमधील एर्नाकुलम येथे जेहोवापंथीय ख्रिश्चन समुदायाच्या एका सभागृहात (झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर) रविवारी सकाळी सलग तीन बॉम्बस्फोट झाले. त्यात दोनजण ठार झाला असून, 52 जण जखमी झाले.
कलामासेरी सेंटरमध्ये या समुदायाचे लोक सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रार्थना करत असताना अवघ्या पाच मिनिटांत एकापाठोपाठ एक सलग तीन स्फोट झाले. सभागृहात तीन दिवसीय कार्यक्रम नियोजित होता. 2300 जणांनी त्यासाठी नोंदणी केली होती. पहिला स्फोट
सभागृहाच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर सभागृहाच्या दोन्ही बाजूला आणखी दोन स्फोट झाले, असे जेहोवाज विटनेसेस संस्थेचे स्थानिक प्रवक्ते टी. ए. श्रीकुमार यांनी सांगितले. स्फोट झाला, त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातही आमच्या समुदायाचा रहिवास लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
इंटेलिजन्स ब्युरो (गुप्त वार्ता विभाग) आणि एनआयएची (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. स्फोट झाला तेव्हा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुमारे एक हजार लोक हजर होते. स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
कोडकारा पोलिस ठाण्यात एकजण स्वत:हून हजर झाला आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आपणच बॉम्ब पेरले होते, असे सांगू लागला. पोलिसांनी त्याची ओळख उघड केलेली नाही.
बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्याने कन्नूर पोलिसांनी अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तो झारखंडचा मूळ रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. मंगळूरहून एरिकोडला जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. स्फोटातील 52 जखमींना शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. 18 जण अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यापैकी सहा वर्षाच्या एका मुलासह सहाजणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकली नाही.
दोन दिवसांपूर्वी एर्नाकुलम येथे हमासला पाठिंबा म्हणून मोर्चा काढण्यात आला होता. हमासचा एक नेता खालिद मशेल त्यात सहभागी झाला होता. विविध मुस्लिम संघटनांचे लोक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. स्थानिक हमास समर्थकांचा या स्फोटाशी संबंध तर नाही, ही बाजूही यंत्रणांकडून तपासून पाहिली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. शहा यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठकही बोलावली व अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. केरळात स्फोट होत होते, तेव्हा मुख्यमंत्री विजयन हे दिल्लीत होते. इस्रायलकडून गाझावर सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षाकडून सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होते.
स्फोटातील जखमींवर उपचारात हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी ताकीद केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.
एर्नाकुलममधील सर्व रुग्णालयांना त्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रजेवर असलेल्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचार्यांना तातडीने कामावर परतण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कलामासेरी मेडिकल कॉलेज, एर्नाकुलम जनरल हॉस्पिटल आणि कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही वीणा जॉर्ज यांनी केल्या आहेत.