Kerala Election Result 2026 Live Updates
तिरुवनंतपुरम: केरळच्या राजकीय भविष्याचा फैसला आज होणार असून, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल. एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'युडीएफ'ला विजयाची संधी वर्तवण्यात आली असली, तरी सत्ताधारी 'एलडीएफ'नेही सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची २०१६ पासूनची सत्ता टिकणार की बुरूज ढासळणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
धर्मडोम
धर्मडोम मतदारसंघात, मुख्यमंत्री पिनराई विजयन पुन्हा एकदा निवडणूक लढवत असून, ते आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या विरोधात UDF चे व्ही.पी. अब्दुल रशीद आणि भाजपचे के. रणजित उभे आहेत.
परावूर
या मतदारसंघात विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन हे आपला सलग सहावा विजय मिळवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात CPI चे ई.टी. टायसन मास्टर यांचे आव्हान आहे.
त्रिशूर
येथे CPI चे अलानकोड लीलाकृष्णन, काँग्रेसचे राजन जे. पल्लन आणि भाजपच्या पद्मजा वेणुगोपाल यांच्यात तिरंगी लढत सुरू आहे. २०२१ च्या निवडणुकीत पी. बालचंद्रन यांनी अत्यंत निसटत्या फरकाने विजय मिळवला होता; त्यामुळे या निवडणुकीत मतांमधील अगदी छोटासा बदलही निर्णायक ठरू शकतो.
केरळमध्ये पुन्हा एकदा LDF आणि UDF यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे; यात भाजपही आपली मुळे रुजवून विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकणाऱ्या भाजपने यंदा जोर लावला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी १२ टक्क्यांवरून १९.२३ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. तिरुवनंतपुरम आणि मध्य केरळमध्ये 'ट्वेंटी२०' पक्षासोबत केलेल्या युतीचा फायदा होईल, अशी आशा भाजपला आहे.
सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कंबर कसली आहे. २०२१ मधील ९९ जागांचा आकडा गाठणे कठीण असले, तरी विकासकामांच्या जोरावर ७५ ते ८० जागा जिंकून सत्ता राखू, असा विश्वास डाव्या आघाडीने व्यक्त केला आहे. जर एलडीएफचा पराभव झाला, तर १९६० नंतर पहिल्यांदाच देशातील कोणत्याही राज्यात डाव्या पक्षांची सत्ता नसेल. त्यामुळे हा निकाल डाव्यांच्या राष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे.
बहुतांश एक्झिट पोलनी यंदा काँग्रेसप्रणित 'युडीएफ'ला कौल दिला आहे. २०१६ पासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक 'करो या मरो' अशीच आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशामुळे युडीएफमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षात आतापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा सुरू झाल्याचे समजते. २०२१ मध्ये युडीएफला केवळ ४१ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदा काही पोलनुसार त्यांना ८० ते ९० जागा मिळण्याची शक्यता असून, बहुमताचा आकडा (७१) सहज ओलांडण्याचा त्यांचा दावा आहे.
केरळमधील १४० मतदारसंघांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. एकूण २.७१ कोटी मतदारांपैकी ७९.६३ टक्के मतदारांनी ८८३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केले आहे. राज्यातील ४३ ठिकाणी एकूण १४० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या मोजणीने प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रत्येक फेरीत जास्तीत जास्त १४ बूथवरील ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. यामुळे दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट कल हाती येण्याची शक्यता आहे. ईव्हीएममधील मतांची संख्या आणि नोंदणीकृत आकडेवारी यात तफावत आढळल्यास, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 'व्हीव्हीपॅट' स्लिप्सची पडताळणी केली जाईल.