पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये २३ वर्षीय तरूणाने आपल्या आजीसह कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२४) उघडकीस आली. मृतांमध्ये त्याच्या प्रेयसीचाही सहभाग आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील वेंजरमुडू पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर युवकाने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होत पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. अफान असे या संशयिताचे नाव आहे. (Kerala Massacre News)
पेरुमला येथील रहिवाशी असलेला अफान सोमवारी (दि.२४) सायंकाळी तिरुअनंतपुरममधील वेंजारामूडू पोलिस ठाण्यात आला आणि त्याने कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे पोलिसही सुन्न झाले. सलमा बिवी (आरोपीची आजी), अहसान (भाऊ), फरशाना ( प्रेयसी), लतीफ (काका) आणि शाहिदा (काकू) अशी खून झालेल्या मृतांची नावे आहेत. कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: विष प्राशन केले होते, यातून तो वाचला असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. (Kerala Massacre News)
अफानला सोमवारी संध्याकाळी ४:३० वाजता पेरुमला येथून जाताना परिसरातील नागरिकांनी पाहिले होते. संशयिताच्या घराची झडती घेतली असता घरात कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह आढळून आले. संशयिताने पाच जणांची हत्या का केली? याचे कारण अजून अस्पष्ट आहे. अफान नुकताच परदेशातून व्हिजिटिंग व्हिसावर परतला होता. त्याचे वडील सध्या परदेशात आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. (Kerala Massacre News)