Elephant Maya Vantara Treatment: केरळमधील अभयारण्यात गेल्या १८ महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या ‘माया’ या हत्तीच्या पिल्लाला आता वनतारा येथे हलवण्यात आले आहे. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अवघ्या १८ महिन्यांच्या मायाला विशेष उपचारांसाठी केरळमधून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा येथे हलवण्यात येत आहे. केरळच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी तिच्या स्थलांतराचे आदेश दिले आहेत.
मायाचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच तिच्या सोबत असलेल्या हत्तींचा कळप नदी ओलांडून पुढे गेला. त्यामुळे ती आईपासून वेगळी झाली. १९ एप्रिल २०२५ रोजी मलयाट्टूर विभागातील काप्रिक्कड परिसरात ती अत्यंत अशक्त असलेल्या अवस्थेत आढळली. वनविभागाने तिला अभयारण्यात आणले. तेव्हापासून वनविभागाचे अधिकारी आणि डॉक्टर तिची काळजी घेत होते.
मात्र २ जुलै २०२६ रोजी खेळताना माया घसरून पडली. यात तिच्या खांद्याला दुखापत झाली. पुढील उपचारांनंतरही तिची प्रकृती सुधारली नाही. तपासणीत तिच्या दोन्ही पुढच्या पायांच्या हाडांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. तसेच हाडे अत्यंत ठिसूळ झाल्याचे समोर आले. ऑक्टोबरच्या अखेरीस तिला स्वतःच्या पायांवर उभे राहणेही शक्य होत नव्हते.
वैद्यकीय पथकाने तिची प्रकृती पाहून इच्छामरणाचा पर्याय सुचवला होता. मात्र, त्यापूर्वी आणखी काही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. वनताराच्या पशुवैद्यकीय पथकाने मायाच्या तपासणी अहवालांचा आणि एक्स-रेचा अभ्यास केला. यावेळी हाडांच्या समस्येमागे पॅराथायरॉईड ग्रंथीशी संबंधित आजार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तिला वनतारामध्ये विशेष उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मायाला कोची विमानतळावरून विमानाने जामनगर येथील वनतारा येथे नेण्यात येत आहे. या प्रवासासाठी वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. वनताराचे पशुवैद्यकीय डॉक्टर तिच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे, मायाची देखभाल करणारे केरळ वनविभागाचे डॉक्टर बिनॉय बाबू आणि तिचा काळजी घेणारा कर्मचारी निखिल बाबूही तिच्यासोबत प्रवास करत आहेत.
वनतारामध्ये मायावर चोवीस तास वैद्यकीय देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला पुन्हा केरळमधील अभयारण्यात आणले जाणार आहे.