दिल्ली विधानसभेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. राजधानीत भाजपने आम आदमी पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. या विजयानंतर भाजप प्रचंड उत्साहित आहे. पराभवानंतर ‘आप’मध्ये असलेले मौन हे पक्षात वादळ उठण्याचे संकेत आहे. निवडणुकीआधी केजरीवाल यांचे मुख्यमंत्रिपद गेले होते. निवडणुकीत स्वतःही हारले आणि पक्षही पराभूत झाल्याने त्यांच्या हाती धुपाटणे आले आहे. या पराभवानंतरही काँग्रेसच्या चेहर्यावर आनंद असल्याचे जाणवत आहे. या मागचे अनेक राजकीय अर्थ आहेत.हे येणार्या काळात उघड होईल.
दिल्लीत गेल्या 27 वर्षांपासून कमळ कोमजले होते. अगोदर 15 वर्षे काँग्रेसने दिल्लीच्या राजकीय दलदलीत भाजपला कमळ फुलवण्यापासून रोखले आणि त्यानंतर ‘आप’च्या झाडूने कमळाला त्याच्या देठावर सरळ उभे राहूही दिले नाही. ‘झाडू’ने दिल्लीच्या राजकारणातून ‘हाता’ला पूर्णपणे दूर केले आहे. आता 27 वर्षांनंतर, कमळ अशा प्रकारे फुलले की ‘झाडू’ पूर्णपणे विखुरला गेला आहे. या निवडणुकीत झाडूने ज्या चेहर्यावर निवडणूक लढली त्या चेहर्याची जागाही ‘आप’ला वाचवता आली नाही. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवामुळे ‘आप’मध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आले. या वादामुळे ‘आप’च्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. या निवडणूक निकालानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीतील नेत्याचे ऐकणार नाहीत.
आता अरविंद केजरीवाल यांची पक्षावरील पकड सैल होईल. आता त्यांच्या बोलण्याला इतर विरोधी पक्षांमध्येही फारसे महत्त्व मिळणार नाही. राजकारणात उगवत्या सूर्याला सर्वजण नमस्कार करतात. दिल्लीचा पराभव केजरीवाल यांच्यासाठी राजकीय घसरण ठरू शकतो. केजरीवाल यांना आता पुन्हा त्यांच्या राजकीय स्थानावर उभे राहण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. केजरीवाल यांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यांच्या पक्षाकडे केडर कार्यकर्ते नाहीत. केजरीवाल यांनी दिल्ली असो वा पंजाब, सर्वत्र काँग्रेसची मतपेढी स्वतःकडे वळवली आहे. सत्तेबाहेर पडल्यानंतर केजरीवाल यांच्याकडे ही मतपेढी उरण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीतील लोक पुन्हा बदलासाठी तयार होतील, तोपर्यंत केजरीवालांचा पक्ष फुटलेला असेल. अशा परिस्थितीत, या बदलाचा फायदा काँग्रेसला नक्कीच होईल.
दिल्लीच्या विजय किंवा पराभवाचे पडसाद इतर अनेक राज्यांमध्येही पडण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपच्या या विजयाचा प्रतिध्वनी थेट बिहारमध्ये ऐकू येईल. भाजप त्यांच्या मित्रपक्ष जदयूसोबतच्या जागावाटपाच्या चर्चेत आघाडीवर राहील. जागावाटप सोडून, भाजप बिहारमध्ये महाराष्ट्राच्या रणनीतीनुसार काम करेल. महाराष्ट्रात भाजपने आपल्या मजबूत मित्रपक्षांना तसेच विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचे काम ज्या पद्धतीने केले. बिहारमध्येही असेच काहीसे दिसून येईल.
दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर, महाराष्ट्रात निवडणूक घोटाळ्याच्या आरोपांना पुन्हा एकदा बळ मिळणार आहे. आता या आरोपांमध्ये दिल्ली निवडणुकाही जोडल्या जातील. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानांमुळे केवळ विरोधकांसाठीच नाही तर भाजपच्या मित्रपक्षांसाठीही समस्या निर्माण होतील. संजय राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रानंतर ‘फ्लोटिंग मतदार’ दिल्लीकडे वळले आहेत. यानंतर ते बिहारला जातील. अशाप्रकारे, ते निवडणुका होणार्या सर्व राज्यांमध्ये जातील. राऊत यांच्या या विधानामुळे भाजपच्या मित्रपक्षांचीही चिंता वाढली आहे. कारण या रणनीतीमुळे विरोधी पक्षांसोबतच मित्रपक्षांनाही धोका निर्माण होऊ लागला आहे.
दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसमध्ये खूप निराशा दिसली नाही. या पराभवासाठी काँग्रेस आधीच तयार होती. काँग्रेसने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, परंतु निकालांबद्दल पक्ष उत्साहित नव्हता. निवडणुकीत खाते न उघडल्यानंतरही काँग्रेस आनंदी आहे. या आनंदामागील राजकीय चालही स्पष्टपणे दिसून येते. काँग्रेसला माहीत आहे की त्यांची मतपेढी ‘आप’ने काबीज केली आहे. जोपर्यंत हा पक्ष सत्तेत आहे तोपर्यंत त्यांची व्होट बँक परत येणार नाही. हेच कारण आहे की ‘आप’ सत्तेबाहेर पडताच काँग्रेसने 2030 मध्ये दिल्लीत सत्तेत येण्याची चर्चा सुरू केली आहे.