उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी यावर्षी २२ एप्रिल रोजी उघडले जाणार आहेत. 
राष्ट्रीय

Char Dham Yatra 2026 | केदारनाथचे द्वार २२ एप्रिलला उघडणार; अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रेला प्रारंभ

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर यात्रेचा मुहूर्त निश्चित, मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या जयघोषाने दुमदुमणार

पुढारी वृत्तसेवा

Char Dham Yatra 2026 schedule

डेहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी यावर्षी २२ एप्रिल रोजी उघडले जाणार आहेत. हिवाळ्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हे मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या जयघोषाने दुमदुमणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यात्रेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

महाशिवरात्रीला मुहूर्ताची निश्चिती

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी हरीश गौर यांनी सांगितले की, भगवान केदारनाथांचे हिवाळी वास्तव्य असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात हा निर्णय घेण्यात आला. हिंदू पंचांगानुसार गणना करून मंदिर उघडण्याची वेळ निश्चित केली. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे कपाट २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडले जातील. दरम्‍यान, या सोहळ्यासाठी ओंकारेश्वर मंदिर साडेनऊ क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीमाशंकर लिंग, आमदार आशा नौटियाल, मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते. भाविकांनी 'जय बाबा केदार'चा जयघोष करत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.

चारधाम यात्रेचे संपूर्ण वेळापत्रक

केदारनाथच्या तारखेसह गढवाल हिमालयातील वार्षिक चारधाम यात्रेचे संपूर्ण वेळापत्रक आता स्पष्ट झाले असून ते पुढील प्रमाणे...

  • गंगोत्री आणि यमुनोत्री धाम: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ एप्रिल रोजी या दोन्ही मंदिरांचे दरवाजे उघडतील.

  • केदारनाथ धाम: २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता भाविकांसाठी प्रवेश सुरू होईल.

  • बद्रीनाथ धाम: २३ एप्रिल रोजी बद्रीविशालचे दर्शन सुरू होईल.

भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य : मुख्यमंत्री धामी

चक्रपूर येथील वनखंडी महादेव मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "२२ एप्रिलपासून केदारनाथ यात्रा सुरू होत असून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिकता आहे." गेल्या काही वर्षांत शिवभक्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षित आणि सुलभ दर्शनासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT