राष्ट्रीय

कठुआ चकमक: आणखी एका दहशतवाद्याचा खात्‍मा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरमधील कठुआच्या हिरानगर भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या आणखी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्‍यान,  जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. चकमकीत सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. तर सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

हिरानगर-कठुआ दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती देताना जम्‍मूचे अतिरिक्‍त पोलीस महासंचालक आनंद जैन म्‍हणाले की, दहशतवादाचा हा एक नवीन घुसखोरी गट आहे. या परिसरात आणखी दहशतवादी असण्याचीही शक्यता आहे. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारेही नजर ठेवली जात आहे. परिसरात दहशतवाद्याने आश्रय घेतल्‍याचे स्‍पष्‍ट होताच. सुरक्षा दलाच्‍या जवानांनी परिसराला वेढा दिला होता. दहशतवाद्याने सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह रोकड जप्‍त

चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये 30 राउंड्स असलेली तीन मॅगझिन, 24 राउंड असलेली आणखी एक मॅगझिन, स्वतंत्र पॉलिथिन बॅगमधील 75 राउंड, तीन ग्रेनेड, 1 लाख रुपयांचे चलन (500 रुपयांच्या 200 नोटा), खाद्यपदार्थांचा समावेश आहे. पाकिस्तानी बनवलेले चॉकलेट, पाकिस्तानी बनावटीची औषधे आणि इंजेक्शन (पेन किलर), एक सिरिंज, A4 बॅटरीचे 2 पॅक आणि अँटेनासह टेपमध्ये गुंडाळलेला एक हँडसेट जप्‍त करण्‍यात आले आहेत.

मंगळवारी रात्री कठुआच्या हिरानगर तालुक्‍यातील सोहले सैदा गावातील एका घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबारात एक जण जखमी झाला. स्‍थानिकांनी या हल्‍ल्‍याची माहिती सुरक्षा दलांना माहिती दिली. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला होता.

'सीआरपीएफ'चा जवान शहीद

सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम राबवली. पोलीस, लष्कर, एसओजी, सीआरपीएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली. अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पहाटे ३ वाजताच्या सुमारास येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान कबीर दास हे गंभीर जखमी झाले. हिरानगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला.

SCROLL FOR NEXT