जम्मू; अनिल साक्षी : इराणमध्ये अडकलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीबाबत अनिश्चितता वाढत असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः एक्झिट कोड मिळण्यात होणारा विलंब, आर्थिक अडचणी आणि प्रक्रियेचा मंद वेग यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, सध्या दररोज केवळ 6 ते 10 विद्यार्थ्यांनाच एक्झिट क्लीअरन्स मिळत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी नियोजित उड्डाणे गमावत आहेत. यामुळे त्यांना 10,000 रुपयांच्या व्हिसा फीसहित आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
किमान 52 विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणीमुळे तत्काळ परत येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. अनेकांचे विमान तिकीट रद्द झाले असून पुन्हा प्रवासासाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. परिस्थिती बिकट झाल्यामुळे काही विद्यार्थी इराण-अझरबैजान सीमेवरून आर्मेनियामार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांना लवकर परवानगी मिळू शकेल.
विद्यार्थ्यांना पूर्वी देण्यात आलेली निवास व्यवस्था रिकामी करण्याचे निर्देश भारतीय दूतावासाकडून देण्यात आले आहेत. कारण हे निवास इतर भारतीय नागरिकांसाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गोलेस्तान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या पासपोर्टमधील व्हिसा स्थितीबाबत विसंगती असल्याची तक्रार केली आहे, ज्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास आणखी उशिरा होऊ शकतो.
जम्मू-काश्मीरमधील पालकांनी तीव्र चिंता व्यक्त करत सरकारला या विद्यार्थ्यांची निकासी प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली आहे. एका पालकाने सांगितले, ‘दिवसागणिक आमची चिंता वाढत आहे. विद्यार्थ्यांना लवकर आणि सुरक्षित परत आणणे आवश्यक आहे.’ अधिकार्यांनी संकेत दिले आहेत की, योग्य वेळी एक्झिट कोड मिळाल्यास सर्व विद्यार्थी 31 मार्चपर्यंत भारतात परत येऊ शकतात. मात्र सध्याच्या गतीमुळे पालकांमध्ये चिंता आहे.