Kashmir Valley tourism : जम्मू-काश्मीर प्रशासनाने सोमवारी (दि. २९) काश्मीर खोऱ्यातील सात प्रमुख पर्यटन स्थळे पुन्हा खुली केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून ही स्थळे बंद करण्यात आली होती. शुक्रवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युनिफाइड हेडक्वार्टरच्या (UHQ) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला हाेता. आजच्या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विभागांमधील तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली काही पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्याचे आदेश देण्यात आले.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बायसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्यानंतर प्रशासनाने सुमारे ५० पर्यटन स्थळे बंद केली होती. काश्मीरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या सात पर्यटन स्थळांमध्ये आडू व्हॅली, राफ्टिंग पॉइंट यन्नर, अक्कड पार्क, पादशाही पार्क, कमान पोस्ट यांचा समावेश आहे.
जम्मू विभागातील डगन टॉप (रामबन), धग्गर (कठुआ), शिव गुंफा (सालाल, रियासी) ही पर्यटन स्थळे देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी जून महिन्यात प्रशासनाने १६ अन्य पर्यटन स्थळेही पुन्हा सुरू केली होती, ज्यात पहलगाममधील काही भागांचाही समावेश होता.