अनंतनाग; वृत्तसंस्था : कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यात 30 लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात एक संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, इस्रायली आणि एक इटलीचा नागरिक देखील असल्याचे सांगितले जात आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरमधील अनेक पर्यटन स्थळांवर विशेषतः हॉटेलांवर रेकी केली होती. यामध्ये पहलगाममधील काही हॉटेलांचा समावेश होता. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, 1 ते 7 एप्रिलदरम्यान ही रेकी झाली होती. या हल्ल्यामध्ये तीनपेक्षा अधिक दहशतवाद्यांनी सहभाग घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत आणि सुरक्षाविषयक बैठका सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियात असून तेथूनच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रातील पुण्यातील एक संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात जखमी झालं आहे. दहशतवाद्यांनी या कायरतापूर्ण हल्ल्याद्वारे ’मोदीला सांग’ असा संदेश देत जणू थेट भारताला युद्धाचे आव्हान दिले आहे. भारतीय सुरक्षा दलांकडून सध्या मोठं ऑपरेशन राबवण्यात येत असून, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी दिल्ली आणि जयपूर येथे हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
कर्नाटकातील शिवमोगा येथील मंजुनाथ हे आपल्या पत्नी पल्लवी आणि लहान मुलासोबत सुट्टीसाठी पहलगाममध्ये आले होते. हल्ल्याच्या वेळी मंजुनाथ यांना गोळी लागून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी सांगितले की, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या नवर्याला मारण्यात आलं. एक दहशतवादी म्हणाला - ’जाओ मोदी को बता देना’. पल्लवी यांनी त्यांच्या नवर्याचा मृतदेह तातडीने हवाई मार्गाने घरी पोहोचवण्याची मागणी केली आहे.
पल्लवी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी नाव विचारल्यानंतर हिंदू आहोत असं सांगितल्यावर त्यांनी गोळी मारली. हल्ल्याच्या वेळी आमच्यासोबत आमचा मुलगाही होता. हल्ल्याच्या वेळी काही स्थानिक नागरिकांनी धाव घेत पल्लवी यांची मदत केली. त्यांनी मला नाही मारलं, उलट म्हणाले, ’जा, मोदीला हे सांग’ असंही त्यांनी सांगितलं.
पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात एका महिलेच्या पतीला गोळी मारण्यात आली. घटनेनंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. ही जोडपी शांततेने भेलपुरी खात असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कारवायांकडे लक्ष वेधलं गेलं आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आर्मी प्रमुख जनरल असीम मुनीर यांचं इस्लामाबादमधील अलीकडचं भाषण लक्षवेधी ठरतं. त्यात त्यांनी बलुचिस्तान, काश्मीर आणि ’टू नेशन थिअरी’चा जोरदार उल्लेख करत भारतावर टीका केली. त्यांनी म्हटलं, काश्मीर ही आमच्या गळ्याची नस आहे आणि ती आम्ही विसरणार नाही. अशी दर्पोक्ती केल्यानंतर हा हल्ला झाला आहे. हा हल्ला पाकिस्तानातून चालवला गेलेला असू शकतो.