नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एकीकडे काश्मीरच्या खोर्यात निसर्गाने पांढरी चादर ओढली आहे, तर दुसरीकडे देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काश्मीरमध्ये शुक्रवारी या हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला, ज्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर, बिहार आणि छत्तीसगडमध्ये अतिवृष्टी झाली.
शुक्रवारी गुलमर्ग, सोनमर्ग आणि गुरेजमधील उंच पर्वतरांगा बर्फाने पांढर्याशुभ्र झाल्या. उंच भागांमध्ये हिमवर्षाव होत असताना, श्रीनगरसह इतर मैदानी भागांत हलक्या पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पाऊस आणि हिमवर्षावाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यापूर्वीच निसर्गाने हे सुंदर रूप दाखवले आहे. या हिमवर्षावामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्थानिक लोकांमध्येही सणासारखा उत्साह पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे बिहारमधील अनेक दुर्गापूजा मंडपांमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचले आहे, ज्यामुळे उत्सवाच्या तयारीत अडथळे निर्माण झाले.
हिमाचल प्रदेशातही हवामानात मोठा बदल झाला आहे. कांगडामध्ये शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसासह गारपीट झाली. यापूर्वी, गुरुवारी रात्री हिमाचलच्या धौलाधार पर्वतरांगांमध्ये हलका हिमवर्षाव झाला. यामुळे धर्मशाळा येथील किमान तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या बदललेल्या हवामानामुळे राज्यात लवकरच हिवाळ्याला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.