अनिल साक्षी
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पंपोर परिसर, जो ‘केशर टाऊन’ म्हणून ओळखला जातो, तेथील पारंपरिक केशर शेती गंभीर संकटात सापडली आहे. लेथपोरा, चंदहारा आणि आसपासच्या भागात केशर लागवडीच्या मोठ्या क्षेत्रावर आता मोहरीसह इतर पिकांनी कब्जा केला आहे. यामुळे काश्मीरच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध केशर उत्पादनाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
चंदहारा येथील शेतकरी आशिक हुसैन यांच्या मते, केशर शेती हळूहळू संपत चालली असून त्यातून मिळणारा परतावा टिकाऊ राहिलेला नाही. केशरच्या तुलनेत मोहरी पिकामध्ये कमी गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी त्या दिशेने वळत आहेत. काही ठिकाणी तर केशरची जमीन पूर्णपणे पडीक ठेवली आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल, मातीचा र्हास, वाढते शहरीकरण आणि वेळेवर हस्तक्षेपाचा अभाव यामुळे उत्पादन क्षमता कमी झाली आहे.
राष्ट्रीय केशर मिशनबाबतही शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. सिंचन सुविधा आणि सुधारित तंत्रज्ञान यांसारख्या उपाययोजना जाहीर झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. ही योजना कागदावर चांगली वाटते; पण शेतकर्यांना फारसा फायदा झालेला नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक उत्पादकांनी दिली.
उत्पादन घट आणि निकृष्ट रोपण साहित्य
केशरच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत मोठी घसरण झाली आहे. चांगल्या दर्जाच्या कंदांचा अभाव हे यामागील प्रमुख कारण असल्याचे शेतकरी सांगतात. अनियमित हवामानामुळे हे कंद नुकसानग्रस्त होत असून त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.
जीआय टॅग असूनही ओळख धोक्यात
काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत (जीआय) टॅग असूनही त्याची ओळख आणि बाजारातील स्थान धोक्यात आले आहे. उच्च दर्जाचे कंद उपलब्ध करणे, वैज्ञानिक पद्धतींचा वापर आणि योजनांवर प्रभावी देखरेख यासाठी पावले उचलली नाहीत, तर येथील केशर शेतीचा वारसा नामशेष होण्याची भीती आहे.
, farmers leaving saffron cultivation, , , India, , climate impact farming Kashmir, spice farming challenges, rural economy Kashmir, traditional crops decline