कर्नाटकातील अलमट्टी धरण pudhari photo
राष्ट्रीय

‘अलमट्टी’ची उंची 5 मीटरने वाढणार; निधीसह भूसंपादनाची कर्नाटकची घोषणा

Almatti Dam : सांगली-कोल्हापूरवर महापुराचे भीषण संकट

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : कृष्णा कालवा योजना-3 अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवून ती 524.256 मीटरपर्यंत करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. शुक्रवारी (दि. 7) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्प सादर करताना धरणाची उंची वाढवण्यासाठी एकाच टप्प्यात जमीन संपादन करून शेतकर्‍यांना भरपाई देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यावरील महापुराचे संकट आणखी भीषण होणार आहे.

धरणाची उंची वाढवल्याने 2.01 लाख एकर जमिनीला पाणीपुरवठा होणार आहे. उंची वाढवण्यासह इतर कामे तातडीने हाती घेण्याची सूचना दिली जाईल, असे ते म्हणाले. अलमट्टीची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे. पावसाळ्यात अलमट्टीमुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका निर्माण होतो.

धरणातील पाणी सोडण्याची मागणी कर्नाटककडे केली जाते. आता धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकने उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यापासून महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी विरोध व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा विरोध असला, तरी कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढवण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबतचा उल्लेख होतो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भूसंपादनाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी काळात भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT