शिवमोगा : पुढारी वृत्तसेवा कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात CET परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांकडून जानवे आणि हातातील रक्षा सूत्र काढायला लावल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवमोगा जिल्ह्यातील शरावतीनगरमध्ये आदिचुंचनगिरी शाळेत सीईटी परीक्षेदरम्यान ही घटना समोर आली होती. कर्नाटक कॉमन एंट्रंन्स (सीईटी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना कथितरीत्या अंगातील जाणवे आणि हातातील धागा काढण्यास सांगण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, नटराज भगवत नावाच्या व्यक्तीव्दारा तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्या परिस्थितीत जाणवे आणि धागा या धार्मिक प्रतिकांना काढण्यास सांगण्यात आले ते समोर यावे.
या घटनेवर उच्च शिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर यांनाही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बिदरच्या परीक्षा केंद्रावरही अशी तक्रार आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र इतर केंद्रांवर योग्यरित्या परीक्षा प्रक्रिया पार पडल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, परीक्षेच्या दरम्यान या गोष्टी हटवण्याचा उल्लेख केला नव्हता. आम्ही सर्व धर्म, त्यांची आस्था आणि त्यांच्या कार्यांचा सन्मान करतो. आम्ही अशा घटनांचा स्विकार करणार नाही. आम्ही अशा प्रकरणांवर कारवाई करणार आहोत.
CET परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात दोरा आणि जाणवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. गेटवर उपस्थित सुरक्षा रक्षकाने २ मुलांना जाणवे आणि हातातला दोरा काढला, मात्र एक विद्यार्थ्याने जाणवे काढण्यास नकार दिला. तेंव्हा त्याला १५ मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले. यानंतर त्याच्या हातातील दोरा (रक्षा सूत्र) काढले. मात्र जाणवे ठेवूनच त्याला परीक्षा केंद्रात जाउ दिले. यावर मुलाच्या मामाने सांगितले की, माझ्या भाच्याला जाणवे काढले नाही म्हणून १५ मिनिटे बाहेर उभा केले. नंतर हातातला पवित्र धागा काढून तो त्या सुरक्षा रक्षकाने डस्टबिनमध्ये टाकला आणि मगच आत सोडले.
या घटनेची माहिती पसरताच लोकांमध्ये संताप निर्माण झाला. या संस्थेच्या गेटवर ब्राम्हण संघटनेचे लोक पोहोचले. त्यांनी गार्डला प्रश्न विचारले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना तेथून घालवले.