पुढारी ऑनलाईन डेस्क : Karnataka DySP Viral Video | पोलीस स्टेशनमधील बाथरूमध्ये तक्रारदार महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी, कर्नाटक सरकारने शुक्रवारी तुमकुरू जिल्ह्यातील मधुगिरी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) बी रामचंद्रप्पा यांना निलंबित केले. कार्यालयातील बाथरूममध्ये महिलेसोबत अयोग्य वर्तन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर राज्य सरकारने कारवाई केली आहे.
पोलीस उपअधीक्षक बी रामचंद्रप्पा हे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांचा मतदारसंघ असलेल्या कोरटागेरेचे डीवायएसपी होते. गुरुवारी रात्री रामचंद्रप्पा यांचा बाथरूममधील एका महिलेसह ३५ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तपासादरम्यान असे समोर आले की, संबंधीत महिला गुरुवारी तिची तक्रार देण्यासाठी इतर काहीजणांसह मधुगिरी पोलीस ठाण्यात आली होती. सोबत आलेले बाकीचे तपास अधिकाऱ्यांशी बोलत होते. रामचंद्रप्पा यांनी त्या महिलेशी मैत्रीपूर्ण वर्तन करून तिला बाजूला घेतले. नंतर दोघे पोलीस स्टेशनच्या इमारतीतीलच एका बाथरूममध्ये गेले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे बाथरूममध्ये अश्लिल कृत्य करत होते. त्यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने बाथरूमच्या खिडकीतून व्हिडिओ रेकॉर्ड केला.
याप्रकरणी तुमकुरुचे एसपी अशोक केव्ही यांनी माध्यमांना सांगितले की, घटनेचा अहवाल एसपींनी पोलीस महानिरीक्षक यांना सादर केला आहे. आयजीपी यांनी तो महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक (डीजी-आयजीपी) आलोक मोहन यांना सादर केला. यानंतर शुक्रवारी रामचंद्रप्पा यांना निलंबित केले.