Karnataka Chitradurga Bus Fire: आज पहाटे ३ वाजता कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील गोरलाथ क्रॉस इथं एक खासगी स्लीपर कोचला आग लागली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीत २० प्रवाशी जिवंत जळाले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी आठ वाजेपर्यंत ९ मृतदेह बाहेर काढले आहेत. अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक हिरीयुरूकडून बंगळुरूकडे जात होता. तर दुसऱ्या बाजूने स्लीपर कोच बंगळुरूकडून कोकर्णकडे जात होती. ही दोन्ही वाहने ज्यावेळी हिरीयुरू इथं आली त्यावेळी ट्रक अचानक डिव्हायडरवरून उडून स्लीपर कोच बसला धडकला.
या धडकेनंतर भर रस्त्यात स्लीपर कोचमध्ये आग लागली. प्राथमिक तसापास यात ट्रक ड्रायव्हरचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ड्रायव्हरचं नाव कुलदीप असून त्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
स्लीपर कोचमध्ये २९ प्रवासी होते. त्यातील १५ महिला तर १४ पुरूष होते. बसमध्ये एकूण ३२ सीट्स होत्या. यातील २५ प्रवासी हे गोकर्णचे होते. तर दोन कुमटा आणि दोन शिवमोग्गाचे होते. दरम्यान, ज्यावेळी बस पेटली त्यावेळी बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि अजून काही लोकांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.
घटनास्थळी एसपी रणजीत यांनी भेट दिली असून त्यांनी तपास कार्याची माहिती घेतली. हिरीयूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या अपघातासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अपघातानंतर माहामार्गावरील वाहतूक खोळंबली असून जवळपास ३० किलोमीटर लांब जाम लागला आहे.
या अपघातानंतर पंतप्रधान कार्यालयानं ट्विट केलं आहे., ' कर्नाटकातील चित्रदुर्गा जिल्ह्यात झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून दुःख झालं. जीव गमवावा लागलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. जे जखमी झालेत ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.'
पंतप्रधान कार्यालयानं ट्विट करून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केली. प्रधान मंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रतर्येकी २ लाख रूपये देण्यात येणार आहेत. तर जखमींना ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत.
सिद्धाराम्मया यांनी, 'चित्रदुर्ग इथे झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती मिळाली. काही प्रवासी जिवंत जाळ्याचे ऐकून वेदना झाल्या. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त घरी जात असलेल्या लोकांसोबत झालेल्या या दुर्दैवी अपघाताने माझे ह्रदय पिळवटून निघाले आहे. या अपघाताची सखोल चौकशी होणार आहे. या अपघाताचे कारण समोर आणलं जाईल. ज्यांनी जीव गमावला त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना.' असे ट्विट केले.
तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी देखील ट्विट करून अपघाताचे वृत्त ऐकून धक्काच बसला अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी देखील मृतांप्रती सहवेदना व्यक्त केल्या असून जखमी लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे.