पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी माणसाला सर्वस्व अर्पण करण्याची ताकद देते. प्रेयसीसाठी कोणत्याही सीमा ओलांडू शकतो, कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो, आणि कोणत्याही त्यागासाठी तयार होतो. पण असा एक विवाहीत प्रियकर ज्याने प्रेयसीसाठी चोरी करून तब्बल ३ कोटी रूपयांचे घर बांधले. मुळचा सोलापूरचा असलेल्या या चोर प्रियकराला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नाटकातील बंगळूरमध्ये ९ जानेवारी रोजी १४ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी एका चोराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १८१ ग्रॅम सोन्याची बिस्किटे, ३३ ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक बंदूक जप्त केली. आरोपी इतका हुशार आहे की त्याचे अनेक अभिनेत्रींशी संबंध आहेत. यापूर्वी त्याने चोरीच्या पैशातून त्याच्या प्रेयसीसाठी महागडे गिफ्ट दिले.
सोलापूर येथील रहिवासी पंचक्षरी स्वामी (वय ३७) असे या संशयित चोराचे नाव असून तो विवाहित आहे. त्याला मुले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. चौकशीत असे आढळून आले की, स्वामी गेल्या दोन दशकांपासून देशभरात चोरी करत होता. २०१४-१५ मध्ये स्वामी एका अभिनेत्रीसोबत राहत होता. तिच्यावर त्याने भरपूर खर्च केला. त्याने कोलकातामध्ये त्या अभिनेत्रीसाठी ३ कोटी रुपयांचे घर बांधले होते. एवढेच नाही तर अभिनेत्रीला २२ लाख रुपयांचे मत्स्यालयही भेट दिले. २०१६ मध्ये, गुजरातमध्ये चोरी करताना स्वामी पकडला गेला. त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करायला सुरुवात केली. एका चोरी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी त्याला पकडले होते. पुन्हा २०२४ मध्ये सुटका झाल्यानंतर तो बंगळूरमध्ये राहत होता.