कानपूर; वृत्तसंस्था : कानपूर पोलिसांनी दिल्ली स्थित व्यावसायिक रवींद्र नाथ सोनी याला आंतरराष्ट्रीय गुंतवणूक घोटाळा चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घोटाळ्यात भारत आणि दुबईमधील शेकडो भारतीयांना सुमारे 970 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा घोटाळा अनेक देशांमध्ये पसरलेला असून यामध्ये क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसा वळवणे, हवाला मार्गांचा वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर बाबी अंतर्भूत असू शकतात. आजपर्यंत सोनीविरुद्ध दुबई, अलिगड, कानपूर नगर, दिल्ली आणि पानिपत येथे प्रत्येकी एक अशा एकूण पाच एफआयआर दाखल आहेत.
परदेशी भारतीयांना लक्ष्य
मूळचा दिल्लीतील मालवीय नगरचा रहिवासी असलेला सोनी काही वर्षांपूर्वी दुबईला गेला आणि त्याने ब्लू चिप ट्रेडिंग या आकर्षक नावाच्या कंपनीसह सुमारे 12 बनावट कंपन्या सुरू केल्या. त्याने उच्च श्रेणीतील फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली परदेशात राहणार्या भारतीयांना तत्काळ 30 ते 40 टक्के परताव्याचे आमिष दाखवले.
पोलिसांनुसार विश्वास संपादन करण्यासाठी सोनीने सुरुवातीची काही वर्षे नियमित परतावा दिला, जो पॉन्झी मॉडेल वर्तनाचा एक भाग आहे. यानंतर त्याने अचानक गुंतवणूकदारांचा निधी वैयक्तिक खाती, क्रिप्टोकरन्सी आणि ऑफशोअर मार्गांनी वळवण्यास सुरुवात केली.
कानपूरचे पोलिस आयुक्त रघुबीर लाल यांनी सांगितले की, त्याच्या बँक खात्यांच्या विश्लेषणानुसार त्याने किमान 400-500 गुंतवणूकदारांकडून सुमारे 970 कोटी जमा केले आहेत. काही रक्कम विश्वास टिकवून ठेवण्यासाठी परत करण्यात आली. परंतु मोठा हिस्सा लगेचच इतर खात्यांमध्ये वळवण्यात आला. महत्त्वपूर्ण भाग क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करण्यात आला, तर काही रक्कम हवाला नेटवर्कद्वारे पाठवण्यात आली.
हा बहुस्तरीय आर्थिक गुन्हा विविध न्यायक्षेत्रांमध्ये पसरलेला आहे आणि यामध्ये यूएई, जपानचे नागरिक आणि मलेशियातील नागरिक हे देखील त्याचे बळी आहेत. या प्रकरणात क्रिप्टोकरन्सीचा वापर, परकीय चलन हस्तांतरण आणि अमेरिका, जपान तसेच दुबईतील व्यक्तींशी संशयित संबंध पाहता केंद्रीय तपास यंत्रणांचेही लक्ष वेधले गेले आहे. आयुक्त म्हणाले, पैसा अनेक देशांमध्ये, क्रिप्टो वॉलेटस्मध्ये आणि हवाला मार्गाने फिरला आहे. किमान 12 परदेशी साथीदारांची ओळख पटली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणार्या अज्ञात निधीच्या हालचालीचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची गंभीरपणे तपासणी करत आहोत.
1) 970 कोटींचा घोटाळा : दिल्लीस्थित व्यावसायिक रवींद्र नाथ सोनी याने भारत आणि दुबईतील भारतीयांना सुमारे रुपये 970 कोटींचा गंडा घातला.
2) गुन्हेगारीचे स्वरूप : हा घोटाळा क्रिप्टोकरन्सी आणि हवाला मार्गांचा वापर करून अनेक देशांमध्ये पसरलेला पॉन्झी मॉडेलवर आधारित आंतरराष्ट्रीय वित्तीय गुन्हा आहे.
3) राष्ट्रीय सुरक्षेचा कोन : मोठ्या प्रमाणात अज्ञात निधीच्या हालचालीमुळे तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
4) बळी कोण : यातील गुंतवणूकदार यूएई, जपान आणि मलेशियासह भारतातील आहेत.