नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात विवाह्यबाह्य संबंध (एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर) याबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. डेटिंग वेबसाइट अॅश्ले मॅडिसनने 2025 च्या अहवालात खुलासा केला आहे की, दक्षिण भारतातील शहर, कांचीपुरम विवाह्यबाह्य संबंधांच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी मुंबईने पहिला क्रमांक पटकावला होता. पण यंदा मुंबई टॉप-10 च्या यादीतून गायब झाली आहे. दिल्लीने दुसरे स्थान मिळवले असून, दिल्ली-एनसीआर मधील नऊ क्षेत्रांचा या यादीत समावेश आहे.
2024 मध्ये कांचीपुरम 17व्या स्थानावर होता, पण यंदा या शहराने थेट पहिला क्रमांक गाठला आहे. अॅश्ले मॅडिसन या डेटिंग प्लॅटफॉर्मवर साइनअप करणार्या वापरकर्त्यांची संख्या येथे देशात सर्वाधिक आहे. तमिळनाडूतील हे शहर, जे मंदिर आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे, आता या अनपेक्षित कारणामुळे चर्चेत आले आहे. या अहवालानुसार, कांचीपुरममधील विवाहित व्यक्तींचा विवाह्यबाह्य संबंधांकडे वाढता कल दिसून येत आहे.
गेल्या वर्षी अव्वल स्थानावर असलेली मुंबई यंदा टॉप-20 मधून बाहेर पडली आहे. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. तर दिल्ली-NCR मधील नऊ क्षेत्रांनी यादीत स्थान मिळवले आहे, ज्यामुळे दिल्लीचा दबदबा कायम असल्याचे दिसते.
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 497 ला असंवैधानिक ठरवताना स्पष्ट केले की, प्रौढ व्यक्तींमधील सहमतीने बनलेले संबंध गुन्हा मानले जाणार नाहीत. मात्र, हे संबंध घटस्फोटाचे कारण ठरू शकतात. कोर्टात याला मानसिक क्रूरता म्हणून पाहिले जाऊ शकते. यामुळे विवाह्यबाह्य संबंध कायदेशीरदृष्ट्या गुन्हा नसले, तरी त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम गंभीर असू शकतात.
अॅश्ले मॅडिसनचे मुख्य धोरण अधिकारी पॉल कीएबल यांच्या मते, विवाह्यबाह्य संबंध लपवण्याची गोष्ट राहिलेली नाही. लोक आता नात्यांबाबत मोकळेपणाने विचार करत आहेत. हे फक्त शारीरिक संबंधांपुरते मर्यादित नाही, तर भावनिक रिकामेपणा भरून काढण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी नमूद केले.