महिला बायकरला मागून धडक देऊन पसार झालेल्या कल्याण बैंसला या कारचालकाला राजस्थानमधील दौसा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  
राष्ट्रीय

Hit and Run Case : बेधुंद अन् बेदरकारपणे महिला बायकरला उडवणारा आरोपी जेरबंद; 'खुनाचा प्रयत्न' केल्याचा गुन्हा दाखल

धक्कादायक घटनेनंतर आरोपी झाला होता फरार, सीटीटीव्ही आणि व्हिडीओच्या आधारे पोलिसांची राजस्‍थानमध्‍ये कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Hit and Run Case : गुरुग्राममधील प्रसिद्ध गोल्फ कोर्स रोडवर महिला बायकरला मागून धडक देऊन पसार झालेल्या कल्याण बैंसला या कारचालकाला राजस्थानमधील दौसा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल झालेल्‍या या हिट-अँड-रन प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई केली असून, आरोपीवर खूनाच्‍या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं होतं?

रविवार, १३ सप्‍टेंबर रोजी सकाळी महिला बायकर शिवानी चौहान (उर्फ सिया) आपल्या बायकर ग्रुपसोबत जात होती. आरोपी कल्याण बैंसलाच्या कारने तिचा पाठलाग सुरु केला. कारमधील व्यक्ती मद्यधुंद असल्याचे दिसून आल्याने सियाने त्यांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले. मात्र, बेदरकार कारचालकाने थेट तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सिया रस्त्यावर फेकली गेली आणि कित्येक मीटर घासली गेली. काळजाचा ठोका चूकविणार्‍या या घटनेचा थरार तिच्या हेल्मेट कॅमेऱ्यात आणि पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बायकरच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही तसांनी सियाने हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. अल्‍पावधीत तो प्रचंड व्‍हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली.

म्‍हणे, यू-टर्न घेताना कारवरील नियंत्रण सुटले

आरोपी कल्याण बैंसला याने आपण महिला बायकरला मुद्दाम धडक दिली नसल्याचा दावा केला आहे. यू-टर्न घेताना कारवरील नियंत्रण सुटले आणि महिला बायकर पुढे आहे याची कल्पना नव्हती, असे त्याने पोलिसांना सांगितले. बायकर ग्रुप माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला करेल या भीतीने मी तेथून निघून गेलो. तसेच ते बायकर्स वारंवार माझ्या गाडीच्या पुढे येऊन वेग कमी करत होते, असाही दावा त्‍याने केला आहे.

आरोपी जिमचा चालक

कल्याण बैंसला हा जिमचा मालक असून, तो स्वतःला आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असल्याचे सांगतो. घटनेनंतर त्याने आपले इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट केले आहे.

केवळ महिला बायकर असल्यामुळे मला लक्ष्य केले

अपघातग्रस्‍त महिला बायकर सिया हिने आरोपीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "जर त्याचा हेतू चुकीचा नव्हता, तर त्याने तिथे थांबून माझी विचारपूस का केली नाही?" असा सवाल तिने केला आहे. केवळ महिला बायकर असल्यामुळे मला लक्ष्य करण्यात आले आणि माझा जीव घेण्याचाच हा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप तिने केला आहे.

गुन्ह्यात खुनाच्या प्रयत्नाचे कलम समाविष्ट

आरंभी पोलिसांनी या प्रकरणात बेदरकारपणे वाहन चालवणे आणि दुखापत पोहोचवणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. मात्र, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि पीडितेच्या कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेनुसार खुनाच्‍या प्रयत्नाचेही कलम वाढवले आहे. व्हिडिओमध्ये कारचालक स्पष्टपणे महिला बायकरच्या दिशेने गाडी ढकलताना दिसत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT