नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. कृष्णकुमार यांची मणिपूर उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्तीला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली. कायदा आणि न्याय मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली. मणिपूर उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल २१ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती डी. कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर रोजी ठरावाद्वारे न्यायमूर्ती कृष्णकुमार यांची उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. न्यायमूर्ती कृष्णकुमार यांची ७ एप्रिल २०१६ रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते २१ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. ते मद्रास उच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.