नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालायातील न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी नियुक्ती केली. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर ५२ वे सरन्यायाधीश म्हणून मुळचे महाराष्ट्रातील असणारे न्यायमूर्ती भूषण गवई १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील.
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती बी. आर. गवईंच्या नावाची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती वरिष्ठतेच्या आधारावर केली जाते. सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती गवई २४ मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत.
- डिसेंबर २०२३ मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला मान्यता देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा न्यायमूर्ती गवई हे भाग होते.
- राजकीय निधीसाठी निवडणूक रोखे योजना रद्द करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा ते भाग होते.
- केंद्राच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाला ४:१ बहुमताने मान्यता देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा भाग होते.
- राज्यांना अनुसूचित जातींमध्ये उप-वर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असा निर्णय देणाऱ्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचे देखील भाग होते.
- न्यायमूर्ती गवई हे पर्यावरणविषयक बाबींवरील ग्रीन बेंचचेही नेतृत्व करत आहेत. जंगले आणि झाडे बेकायदेशीरपणे तोडण्याबाबत त्यांनी अनेक कठोर आणि मोठे निर्णय दिले आहेत.
- जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला
- १६ मार्च १९८५ रोजी वकिलीला सुरुवात
- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि माजी न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत १९८७ पर्यंत काम केले
-१९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली
- १९९० नंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली
- १७ जानेवारी २००० रोजी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती
- १४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती
- १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून कार्य केले
- २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होणार आहेत
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे ५१ सरन्यायाधीश संजीव खन्ना ११ नोव्हेंबर २०२४ पासून कार्यरत आहेत. त्याअगोदर धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ रोजी संपला आणि ते निवृत्त झाले.