पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार ( Sushil Kumar) याला आज (दि. ४) दिल्ली उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. यापूर्वी जुलै २०२३ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला ७ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मे २०२१मध्ये त्याने शरणागती पत्करली हाेती. तेव्हापासून तो तिहार कारागृहात होता. ( Sagar Dhankar murder case )
मालमत्तेच्या वादातून सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ४ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये २३ वर्षीय सागर धनखड आणि त्याचा मित्र सोनू आणि इतर तिघांवर हल्ला केला होता. यात सागर धनखडचा मृत्यू झाला .सागर आणि त्याच्या मित्रांनी सुशील कुमारचा फ्लॅट सोडला नसल्याने वाद झाला होता. त्यातून धनखडची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समाेर आली हाेती. सुशील कुमार याने मे २०२१ मध्ये दिल्लीतील तिहार तुरुंगात शरणागती पत्करली होती. त्याच्यावर दंगल, बेकायदेशीर जमाव आणि गुन्हेगारी कट यासह ज्युनियर कुस्तीपटूचा खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.