नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्रोबेशनरी प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी यांची सेवासमाप्तीचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना आणि राजकीय वर्तुळातून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला जात आहे. याबरोबरच कुलगुरुंनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि.२९) केली.
डॉ. रोहन चौधरी हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांची मार्च २०२४ मध्ये जेएनयू येथे समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर ते एका वर्षाच्या प्रोबेशन कालावधीत कार्यरत होते. मात्र, त्यांचा प्रोबेशन कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्यात आला. दरम्यानच्या काळात त्यांनी वैद्यकीय कारणांमुळे रजा घेतली. डॉ. रोहन चौधरी यांनी त्यांच्या रजेबद्दल विभागप्रमुखांना देखील कळवले होते. मात्र, त्यांना रितसर अर्ज करता आला नाही. त्यानंतर कुलगुरु डॉ. शांतिश्री पंडित यांनी त्यांच्या रजेबद्दल चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालात डॉ. चौधरी यांनी ५१ दिवस रजा घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांना या रजेसाठी रितसरपणे अर्ज केला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच त्यांनी काही नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालाच्या आधारे २७ ऑगस्ट रोजी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सेवासमाप्तीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत इतर सदस्यांना मते मांडण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळे हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप प्राध्यापक संघटनेने केला आहे.
जेएनयू प्राध्यापक संघाने डॉ. चौधरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्राध्यापक संघाचे अध्यक्ष सुरजित मजुमदार आणि सचिव मीनाक्षी सुंद्रीयाल यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई अन्यायकारक आणि नियमबाह्य आहे. डॉ. रोहन चौधरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राध्यापकांचा संघर्ष सुरु राहील, असे त्यांनी म्हटले. कार्यकारी मंडळात हा निर्णय घेण्याचा अधिकार असतो पण त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय कुलगुरू यांनी व्यक्तिगत घेतला आहे, असे मजुमदार म्हणाले. सगळ्या प्राध्यापकांना ही एकप्रकारे दिलेली धमकी आहे, ही हुकूमशाही आहे. विद्यापीठाने नियमाची मोडतोड केली आहे. त्यामुळे विद्यापीठ, कुलगुरू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ. रोहन चौधरी यांनी काय गुन्हा केला आहे की, तुम्ही त्यांना नोकरीवरून काढून टाकू शकता? असा सवाल त्यांनी केला.