Jammu Kashmir rain
कठुआ : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, कठुआ जिल्ह्यातील घाटी गाव आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. याआधी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत ६० जणांचा बळी गेला होता, त्यापाठोपाठ ही दुसरी मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास कठुआतील जुठाना जोड परिसरात दरड कोसळून एक कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील राजबाग परिसरातील दुर्गम घाटी गावात आणि जवळच्या दोन ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे आलेल्या जलप्रलयामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. राजबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंह यांनी सांगितले, "या घटना पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान घडल्या. मदत आणि बचाव पथकांच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत."
कठुआतील राजबाग भागातील घाटी गावात पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे संयुक्त पथक दाखल झाले असून, स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, सहा जणांना जखमी अवस्थेत वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जांगलोट येथील औद्योगिक वसाहत, केंद्रीय विद्यालयाचे आवार आणि पोलीस ठाण्यातही पाणी शिरले आहे. रेल्वे रुळ आणि रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कठुआ येथील पोलीस ठाणेही पूर्णपणे जलमय झाले होते.
जिल्हा पोलीस प्रमुख शोभित सक्सेना यांनी मृतांच्या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "ही ढगफुटी नव्हती, तर मुसळधार पावसामुळे आलेला आकस्मिक पूर होता. आम्ही लष्करालाही माहिती दिली असून, त्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे." भारतीय हवामान विभागाच्या व्याख्येनुसार, एका तासात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्याला 'ढगफुटी' म्हटले जाते. तांत्रिकदृष्ट्या या घटनेला ढगफुटी म्हणता येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहार खड्ड आणि उझ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. रविवारी पहाटे उझ नदीलाच मोठा पूर आल्याचे समजते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 'X' वर माहिती देताना लिहिले, "नागरी प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दले तातडीने कामाला लागली आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे." याशिवाय, कठुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागर आणि चांगडा गावांमध्ये, तसेच लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिलवान-हुतली येथेही दरडी कोसळल्या आहेत.