श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात कार्यालयीन वादातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका हेड कॉन्स्टेबलने कार्यालयात घुसून सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार सुरक्षा जवानांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा दलांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील ‘सेवा-२ जलविद्युत प्रकल्प’ परिसरात मंगळवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता ही घटना घडली. हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बसोहली येथील मश्का गावातील ‘सेवा-३’ ऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’चे पथक तैनात करण्यात आले होते. तेथे उपस्थित जवानांमध्ये काही कारणावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित जवानाने रागाच्या भरात थेट एके-४७ चा वापर केला.
या गोळीबारातील संशयित आरोपीची ओळख २००९ च्या तुकडीतील हेड कॉन्स्टेबल अवधेशकुमार सिंह अशी झाली आहे. अवधेशकुमार सिंह याने शासकीय सेवेसाठी दिलेली एके-४७ रायफल घेऊन कार्यालयात प्रवेश केला आणि सहकाऱ्यांवर थेट गोळ्या झाडल्या. त्याच्याजवळ तब्बल १५० काडतुसे होती. गोळीबारानंतर आरोपी हेड कॉन्स्टेबलला तत्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांची ओळख पटली असून त्यात असिस्टंट कमांडंट अंकितकुमार पांडे, सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंह, कॉन्स्टेबल रफिक अहमद आणि कॉन्स्टेबल संदीप कुमार यांचा समावेश आहे. या भीषण घटनेची गंभीर दखल घेत ‘सीआयएसएफ’ प्रशासनाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले असून नेमक्या कोणत्या कारणावरून वाद पेटला, याचा शोध घेतला जात आहे.