Jitendra Awhad NCP spokesperson
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड करण्यात आली. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. त्यासोबतच आणखी एक जबाबदारी देण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने सरचिटणीस राजीव झा यांनी नियुक्ती जाहीर केली. ही नियुक्ती म्हणजे आव्हाड यांची राष्ट्रीय स्तरावर बढती मानली जाते.
जितेंद्र आव्हाड हे खुद्द शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकनिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ते सलग चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यापुर्वी ते विधान परिषदेवर होते. काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आव्हाड पक्षात सक्रिय आहेत. पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.