Jio Airtel Data Plan
नवी दिल्ली : मोबाईल फोनवर इंटरनेट वापरण्यासाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. रिलायन्स जिओने आपला दररोज १ जीबी डेटा देणारा २४९ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद केल्यानंतर, आता भारती एअरटेलनेही बुधवारी आपला त्याच किमतीचा प्लॅन बंद केला आहे.
देशातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया (Vi) सुद्धा लवकरच आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणे हा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना आता थेट दररोज १.५ जीबी डेटा देणाऱ्या प्लॅनने सुरुवात करावी लागेल, ज्याची किंमत जास्त आहे. विश्लेषकांच्या मते, या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांच्या 'प्रति ग्राहक सरासरी महसुलात' (ARPU) वाढ होण्यास मदत होईल. कंपन्या थेट दरवाढ करण्याऐवजी ही रणनीती वापरत आहेत. मुख्य दरवाढ पुढील वर्षी अपेक्षित आहे. जिओच्या या निर्णयानंतर नवीन बेस डेटा प्लॅन, जो दररोज १.५ जीबी डेटा देतो, तो आता १७ टक्के महाग होऊन २९९ रुपयांना मिळत आहे. याउलट, भारती एअरटेलचा दररोज १.५ जीबी डेटा देणारा प्लॅन ३१९ रुपयांना उपलब्ध असेल. सध्या व्होडाफोन आयडिया (Vi) २९९ रुपयांमध्ये दररोज १ जीबी डेटा देणारा प्लॅन देत आहे.
जेएम फायनान्शियल च्या अहवालानुसार, जिओच्या २०-२५% ग्राहकांकडे हा १ जीबी डेली डेटा प्लॅन होता. त्यामुळे हा प्लॅन बंद केल्याने कंपनीचा ARPU दरमहा ११ ते १३ रुपयांनी (६-७% वाढ) वाढू शकतो. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचा २०२६-२७ च्या एकत्रित EBITDA मध्ये १,९०० ते २,२०० कोटी रुपयांची (१-१.३%) वाढ होऊ शकते. एअरटेलबाबतही तशीच गणितं मांडली गेली आहेत. १८ ते २० टक्के ग्राहक 1GB/Day प्लॅन वापरतात. तो बंद केल्यास ARPU १० ते ११ रुपयांनी (४-४.५% वाढ) वाढू शकतो. यामुळे कंपनीच्या २०२७ च्या EBITDA मध्ये १८ ते २० अब्ज रुपयांची (सुमारे २%) वाढ होईल.