पुढारी ऑनलाईन डेस्क : Jharkhand Maoist Encounter | झारखंडमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी विवेक याच्यासह आठ नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. आज (दि. २१) सकाळी बोकारो जिल्ह्यातील लालपानिया भागातील लुगु टेकड्यांमध्ये ही चकमक झाली.
केंद्रीय राखीव पोलीस दलाने राज्य पोलिसांसोबत ही संयुक्त कारवाई केली. लालपानिया भागातील लुगु हिल्समध्ये पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास चकमक सुरू झाली. २०९ कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन (कोब्रा) च्या जवानांनी ८ नक्षलवाद्यांना ठार मारले. चकमकीदरम्यान एक एके सिरीज रायफल, तीन इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर), आठ देशी बनावटीच्या बंदुका आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोब्रा ही सीआरपीएफची विशेष जंगल युद्ध तुकडी आहे. दरम्यान, अजूनही अधूनमधून गोळीबार सुरूच असल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाने दिली आहे.