Ramgarh SUV Accident File Photo
राष्ट्रीय

Jharkhand Accident: शिक्षक झाल्याच्या आनंदात कुटुंब देवदर्शनाला निघालं; वाटेतच काळानं गाठलं, झारखंडमध्ये भीषण अपघात; १३ ठार

झारखंडमधील रामगड जिल्ह्यात रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू झाला.

मोहन कारंडे

Jharkhand Accident

रामगड: शिक्षकाची नोकरी मिळाल्याच्या आनंदात कुटुंबासह देवदर्शनासाठी जात असताना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. रविवारी पहाटे झारखंडमधील रामगड जिल्ह्यात रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये १३ जण जागीच ठार झाले.

पहाटेच्या सुमारास अपघात

मृत व्यक्तींमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कुजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैंकी येथे भाजप कार्यालयाजवळ पहाटे २ च्या सुमारास घडला. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील जंगहारो गावातून १४ जण एका एसयूव्हीमधून रजरप्पाच्या दिशेने जात असताना, महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला, तर गाडीतील एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील हे भाविक असल्याचे समजते. स्कॉर्पिओ (क्रमांक: BR21P 6331) गाडीत एकूण १४ लोक होते. कुटुंबातील एका सदस्याला शिक्षक पदावर नोकरी मिळाल्याच्या आनंदात, ते रजरप्पा मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जात होते.

स्थानिक रहिवाशांकडून बचावकार्य

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावत गेले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. त्यांनी अपघातात ग्रस्त वाहनाच्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढले आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT