नवी दिल्ली : प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची शनिवारी देशाचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असलेल्या ‘विज्ञान रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नारळीकर यांचे यावर्षी 20 मे रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. ‘आकाशाशी जडले नाते’ या माहिती ग्रंथातून संपूर्ण खगोलविज्ञान अत्यंत सोप्या भाषेत मराठीतून मांडण्याची किमया डॉ. नारळीकर यांनी केली.
अनेक विज्ञान कादंबर्या आणि कथांच्या माध्यमातून आबालवृद्धांमध्ये त्यांनी विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण केले. त्याचवेळी त्यांनी विज्ञानाच्या कोणत्याही सिद्धांताला धक्का लागणार नाही, याचीही काळजी घेतली. केम्ब्रिज विद्यापीठात असताना ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉएल यांच्या जोडीने ‘बिग बँग थिअरी’ला आव्हान देणारे संशोधन त्यांनी केले. दरम्यान, सरकारने 2025 साठी आठ विज्ञान श्री पुरस्कारांचीही घोषणा केली आहे. यामध्ये ज्ञानेंद्र प्रताप सिंह (कृषी विज्ञान), युसूफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), के. थंगराज (जैविक विज्ञान), प्रदीप थलप्पिल (रसायनशास्त्र), अनिरुद्ध भालचंद्र पंडित (अभियांत्रिकी विज्ञान), एस. वेंकट मोहन (पर्यावरण विज्ञान), महान एमजे (गणित आणि संगणक विज्ञान) आणि जयन एन (अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान) यांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारने 14 विज्ञान पुरस्कारही जाहीर केले.
कोलकाता येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे सहयोगी प्राध्यापक दिव्येंदु दास यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार (आरव्हीपी) 2025 अंतर्गत प्रतिष्ठित विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कारसाठी निवड झाली . प्रा. दास रासायनिक विज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. रसायनशास्त्रातील त्यांच्या अग्रगण्य योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.