Japan Investment in India | जपानची भारतात ६२.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक  
राष्ट्रीय

Japan Investment in India | जपानची भारतात ६२.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत आणि जपानने आपल्या संबंधांना नवी धोरणात्मक दिशा देत आर्थिक सुरक्षा भागीदारी आराखडा, संरक्षण उपकरणांचा संयुक्त विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा आणि सेमीकंडक्टर यासारख्या क्षेत्रांत व्यापक सहकार्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांच्यातील शिखर चर्चेनंतर दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आर्थिक, तांत्रिक आणि संरक्षण सहकार्याला नव्या उंचीवर नेणे हा याचा उद्देश आहे. दरम्यान, जपान आगामी दहा वर्षांत भारतात १० ट्रिलियन येन अर्थात ६२.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधान ताकाईची यांच्यात गुरुवारी झालेल्या १६ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेनंतर, दोन्ही देशांनी आर्थिक सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऊर्जापुरवठा साखळी मजबूत करण्याशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण करारांना मंजुरी दिली. या करारांच्या माध्यमातून भारत आणि जपानने धोरणात्मक, तांत्रिक आणि ऊर्जा सहकार्याला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या अनिश्चित जागतिक वातावरणात आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा ही दोन्ही देशांची सामायिक प्राथमिकता बनली आहे. याच उद्देशाने तयार करण्यात आलेल्या संयुक्त रोडमॅपमुळे सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान आणि प्रगत साहित्य (ॲडव्‍हान्‍सड्‌ मटेरियल्स) यासारख्या धोरणात्मक क्षेत्रांतील पुरवठा साखळी मजबूत केली जाईल.

संरक्षण सहकार्याला नवी दिशा देत भारत आणि जपानने पहिल्यांदाच संयुक्त संरक्षण तंत्रज्ञान विकास प्रकल्पावर करार केला आहे. याअंतर्गत नौदलाच्या ‘युनिकॉर्न’ या रेडिओ अँटेनाचा सहविकास केला जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा करार दोन्ही देशांच्या संरक्षण भागीदारीत एक नवा अध्याय सुरू करेल आणि सागरी सुरक्षा तसेच प्रादेशिक शांततेला बळ देईल. दोन्ही देशांमधील बैठकीत आरोग्य क्षेत्रात औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांतही करार झाले.

जागतिक एआय विकासाला नवा वेग येईल : पंतप्रधान मोदी

तांत्रिक सहकार्याला भविष्यातील सर्वात मजबूत आधार मानत दोन्ही देशांनी एआय क्षेत्रात संयुक्त निवेदनही जारी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपानचे प्रिसिजन तंत्रज्ञान आणि भारताची सॉफ्टवेअर क्षमता यांचा मेळ जागतिक एआय विकासाला नवा वेग देईल. या क्षेत्रात दोन्ही देशांतील अनेक प्रमुख संस्थांमध्ये सहकार्य करारही झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT