पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देणार असा विश्वास व्यक्त करत राज्यातील सर्व २४३ जागांवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आज (दि.२५) जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर ( prashant kishor) यांनी केली. आपला पक्ष ४० महिला उमेदवारांना तिकीट देणार असल्याचेही निवडणूक रणनीतीकार ते राजकीय नेते असा प्रवास राहिलेले प्रशांत किशोर यांनी जाहीर केले.
प्रशांत किशोर म्हणाले की, २०२५ मध्ये होणार्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पार्टी २४३ जागांवर निवडणूक लढवेल. यामध्ये किमान ४० महिला उमेदवार असतील. तर २०२० विधानसभा निवडणुकीत ७० ते ८० महिला उमेदवार असतील. महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत, तोपर्यंत त्यांना समानता मिळणार नाही. महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कमी व्याजावर कर्ज मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आमचे सरकार स्थापन झाल्यावर लोकांना उत्पन्नासाठी बिहारमधून स्थलांतर करावे लागणार नाही. बिहारमधील जनतेने फक्त नेत्यांची मुले-मुली पाहून नव्हे तर त्यांच्या मुला-मुलींना पाहून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तेजस्वी यादव जात, खंडणी, दारू माफिया, गुन्हेगारी यावर बोलले तर टिप्पण्या करता येतील; पण तेजस्वी यादव यांनी विकास मॉडेलवर चर्चा करणे हे हास्यास्पद ठरते. गेली 15 वर्षे ते सत्तेत आहेत, त्यांना जीडीपी वाढ काय हेच माहीत नाही. हे लोक आज बिहारच्या विकासावर बोलत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
सहा महिन्यांपूर्वी तेजस्वी यादव जेव्हा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा बिहार त्यांच्यासाठी स्वित्झर्लंड होता. सहा महिन्यांनंतर आता त्यांच्यासाठी बिहार गटार झाला आहे. आज जर नितीश कुमार महागठबंधनात सहभागी झाले तर बिहार त्यांना पुन्हा छान वाटू लागेल, असेही ते म्हणाले.
प्रशांत किशोर २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीदिनी आपला नवीन पक्ष जन सुराज पार्टीची स्थापना करणार आहेत. तत्पूर्वी संपूर्ण बिहारमध्ये आठ राज्यस्तरीय बैठका आयोजित केल्या जात आहेत, ज्यात मोहिमेशी संबंधित 150,000 हून अधिक पदाधिकारी सामील होतील. या बैठकांमध्ये पक्षाची स्थापना, नेतृत्व, घटना आणि प्रमुख प्राधान्यक्रम यावर चर्चा होणार आहे.