पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. बसंतगडमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज, सोमवारी (दि. 19) दुपारी साडेतीन वाजता जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी टीमसोबत गस्त घालणाऱ्या सीआरपीएफच्या तुकडीवर जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. सीआरपीएफची ही तुकडी उधमपूरमधील डुडू पोलिस स्टेशनच्या शीतल भागात तैनात आहे. या चकमकीत सीआरपीएफचे इन्स्पेक्टर कुलदीप सिंह शहीद झाले. ते हरियाणाचे रहिवासी आहेत.
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हा हल्ला दुडू भागातील पोलीस चौकीपासून आठ किलोमीटर अंतरावर घडली आहे. दहशतवादविरोधी नवीन उपाययोजनांचा भाग म्हणून जम्मूच्या डोंगराळ भागात ही चौकी स्थापन केली जात होती. मागील हल्ले पाहता, सरकारने या भागात गस्त वाढवण्याचे आणि कडक पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते.