जम्मू; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमध्ये अमली पदार्थांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या ‘नशामुक्त जम्मू-काश्मीर अभियान’ला वेग आला असून, या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून, ड्रग्ज तस्करी रोखणे, आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करणे आणि जनजागृती वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
11 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत एनडीपीएस कायद्यान्वये 378 गुन्हे नोंद झाले आहेत, तर 431 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. पोलिस कारवाईत 478 किलो अमली पदार्थ जप्त केले गेले. त्यात 13 हजार 427 गोळ्या, कॅप्सूल आणि सायकोट्रॉपिक औषधांच्या बाटल्या जप्त केल्या गेल्या. त्याची एकूण अंदाजे किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. तसेच 4 हजार 776 किलो अमली पदार्थ नष्ट केले गेले. यात 6 हजार 493 गोळ्या व संबंधित पदार्थांचा समावेश होता. तपासादरम्यान 78.32 लाख रुपयांच्या 16 चल मालमत्ता तर 9.13 कोटी रुपयांच्या 17 अचल मालमत्ता जप्त केल्या. 52 मुख्य तस्कर तसेच 2898 ड्रग्ज विक्रेत्यांवर सतत देखरेख ठेवली गेली होती.
अफू लागवडीवर कारवाई
एकूण 994 जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्यात हजारो नागरिकांना सहभागी करून घेतले गेले. 1500 तपास अधिकार्यांना, 15 सरकारी वकिलांना विशेष प्रशिक्षण दिले. 2274 प्रतिष्ठानांची तपासणी केली. 88 जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले. 19 वाहनांची नोंदणी रद्द केली. अफूच्या बेकायदेशीर लागवडीवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात पिके नष्ट केली आहेत.