श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात लँडमाईनच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या एका 17 वर्षीय मुलाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव शाहिद युसूफ आहे. रविवारी खुंद्रू येथील शस्त्रसाठा डेपोजवळ झालेल्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तातडीने श्रीनगर येथील 92 बेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहिदचा पाय लँडमाईनवर पडला होता की, हा स्फोट अन्य कोणत्या कारणाने झाला, याचा तपास अधिकारी करत आहेत. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढविण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे.