नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. जम्मू-काश्मीरच्या जनतेने लोकसभा निवडणुकीच्या निकालात जो कौल दिला होता, तसाच विधानसभेतही दिला आहे. विधानसभा निवडणूक निकालात नॅशनल कॉन्फरन्सला 42, काँग्रेसला 6, भाजपला 29, पीडीपीला 3 जागांवर विजय मिळवता आला आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये विविध पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीची तुलना करता हा निकाल गत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानेच लागलेला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 5 लोकसभा मतदारसंघ आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीत या पाच मतदारसंघांपैकी 2 जागांवर इंडिया आघाडी, 2 जागांवर भाजप आणि 1 जागेवर राशीद इंजिनिअर यांनी विजय मिळवला होता. श्रीनगर, अनंतनाग जागांवर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष, जम्मू आणि उधमपूरमध्ये भाजप, तर बारामुल्लामध्ये अपक्ष उमेदवार राशीद इंजिनिअर यांचा विजय झाला होता .
* जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी गांदरबल आणि बडगाम या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर ते विजयी झाले.
* पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीगुफवारा-बिजबेहारा या मतदारसंघात त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव झाला.
* भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना नौशेरा या मतदारसंघातून पराभूत झाले.
* काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक हामीद कारा यांचा सेंट्रल शेल्टेंग मतदारसंघातून विजय झाला.
* आम आदमी पक्षाचे मेहराज मलिक यांनी डोडा मतदारसंघातून विजय मिळवत पक्षाच्या विजयाचे जम्मू-काश्मीरमध्ये खाते उघडले आहे.
1. दशकभरापूर्वी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला 28 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळेस केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.
2. गुलाम नबी आझाद यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष, राशीद इंजिनिअर यांचा जम्मू-काश्मीर अवामी इत्तेहाद पक्ष यांनाही या निवडणुकीत काहीही करता आले नाही.