Kupwara Terrorists
कुपवाडा : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय लष्काराने खात्मा केला. माचिल आणि दुदनियालजवळ ही चकमक झाली असून शोध मोहीम सुरू आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १३) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जवानांना कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर काही संशयास्पद हालचाली दिसल्या. जवानांनी तात्काळ गोळीबार करत या हालचालींना प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. येथे अजूनही ऑपरेशन्स सुरू असून, याबाबत अधिक माहिती नंतर दिली जाईल, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अलिकडेच, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कांडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बीरंथब परिसरात दहशतवाद्यांसह जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) यांच्यात चकमक झाली होती.
सुरक्षा यंत्रणांना 'हाय अलर्ट'चा आदेश
दरम्यान, हिवाळ्याच्या तोंडावर बर्फवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाचा फायदा घेऊन घुसखोरी होऊ नये, यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांना दिल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
जवळजवळ तीन तास चाललेल्या या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे महासंचालक आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.