जळगाव : ‘पुष्पक एक्स्प्रेस’मध्ये आग लागण्याच्या अफवेमुळे प्रवासी खाली उतरल्यावर दुसर्या रुळावरून येणार्या रेल्वेखाली चिरडून 13 जणांचा मृत्यू झाला. या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदनापासून ते त्यांच्या ओळख पटण्यांपर्यंतचे सर्व कामकाज शासकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरांचे पथक अविश्रांतपणे करत आहे. अजूनही हे पथक शवाविच्छेदनगृहामध्ये ठाण मांडून आपले कर्तव्य बजावत आहे. गुरुवारी या महिला डॉक्टरांच्या पथकाने सकाळपासून 12 रुग्णांचे शवविच्छेदन केले आहे.
बुधवारी (दि. 22) दुपारी चार वाजेच्या सुमारास लखनऊवरून मुंबईला जाणार्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पाचोरा तालुक्यातील परधाडे या गावाजवळ आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी गाडीतून बाजूच्या रुळावर उड्या मारल्या; मात्र मागून येणारी बंगलोर एक्स्प्रेस त्यांना दिसली नाही आणि त्याखाली चिरडून 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे सर्व मृतदेह तत्काळ जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. सायंकाळी 6 वाजेपासून ते दुसर्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत शवागृहामध्ये महिला डॉक्टरांनी शवविच्छेदनाचे कर्तव्य पार पाडले.
हे सर्व मृतदेह छिन्नविछिन्न झालेले होते. काहींचे धड होते तर शीर नव्हते. काहींचा चेहरा होता, पण ओळख पटत नव्हती. शवविच्छेदन करणे, त्यांची डीएनए तपासणी आणि शरीराचे तुटलेले तुकडे जोडण्याचे कामही करण्यात आले. यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. चंद्रमोहन हरणे, डॉ. करिष्मा सोनवणे, डॉ. स्वाती सिन्हा, डॉ. सोनल बोरोले, डॉ. नीता पवार गेल्या 24 तासांपासून सर्व मृतदेहांच्या शवविच्छेदनापासून केमिकल लावून ते मृतदेह त्यांच्या निश्चित ठिकाणी नेण्यासाठी मदत करीत आहेत.
गुरुवारी (दि.23) डॉ. करिष्मा सोनवणे, डॉ. स्वाती सिन्हा, डॉ. सोनल बोरोले, डॉ. नीता पवार यांनी पहाटे 6 वाजेपासून ते दुपारपर्यंत 12 मृतदेहांचे शवविच्छेदन केले. त्यांना पवन जाधव, राज जाधव यांनी मदत केली, तर अपघात झाल्यापासून शवविच्छेदनगृहामध्ये हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, पीसी ईश्वर खवडे, कैलास शिंदे, सचिन देशमुख, सिद्धार्थ सुरवाडे, प्रशांत शेंगदाणे हे पंचनामे करण्यापासून ते मृतदेहाची सर्व कागदपत्रे व शासकीय पूर्तता करण्याचे काम पाहत आहेत.
गुरुवारी पोलिसांसह फॉरेन्सिकच्या पथकाने अपघातस्थळी रेल्वेच्या रुळावर तपासणी केली. ज्या मृतदेहाचे अवयव सापडले आहेत, त्यांच्या ओळख पटविण्याबरोबर डीएनए तपासणीसाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी श्वानपथकही तैनात करण्यात आले होते.